पिंपरी-चिंचवड महापालिका बरखास्त करा- काँग्रेस

पुणे-  सत्ताधारी भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या ‘सीमा’ ओलांडून ‘सावळा’ गोंधळ सुरू केला आहे. अशातच विरोधी पक्ष गप्प असून, शिवसेनेची भूमिका देखील संशयास्पद आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका बरखास्त करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यामार्फत सभागृहात करणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आल्याने भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. मुठभर लोकांच्या हाती सत्ता केंद्रीत झाली आहे. भाजपचे नगरसेवकच मुख्यालयात शहरातील बेकायदेशीर फ्लेक्‍स आणून टाकत आहेत. या काळात राष्ट्रवादीकडून होणारा विरोध नगण्य आहे. मात्र, शिवसेनेला भाजपने केलेल्या चोरीत वाटा मिळाला नाही, याचा आक्षेप आहे. का वाटाच मिळत नाही, यावर आक्षेप आहे, हेच समजायला मार्ग नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील यावर बोलत नाहीत. त्यांना सत्तेत सहभागी होण्यास कोण भाग पाडत आहे, असा प्रश्‍न सर्वांनाच पडल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

या निवडणुकीत काँग्रेसला महापालिकेत प्रतिनिधित्व मिळाले नाही, हे आमचे दुर्देव आहे. मात्र, या अपयशाने खचून न जाता आम्ही नव्याने पक्ष संघटना बांधणीला सुरुवात केली आहे. मात्र, वर्षभरातच पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत हीच अवस्था असल्याने पुढील वेळी कोणाचे सरकार येईल, असे पालक मंत्री गिरीष बापट यांचे सूचक वक्तव्य असल्याकडे साठे यांनी लक्ष वेधले.

अनधिकृत बांधकाम कारवाईत दुजाभावपिंपळे गुरवमधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर सत्ताधाऱ्यांकडून बुलडोजर फिरविला जात आहे. तर दुसरीकडे नागरिकांनी लेखी तक्रार करुन, तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊनही पिंपळे निलखमध्ये बेकायदेशीरपणे उभारलेल्या एका वाईन शॉपवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप साठे यांनी पत्रकार परिषदेत केला.