पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचा विनामास्क ‘रॅम्प वॉक’; सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा

usha dhore

चिंचवड : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित करत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत.

गेल्या आठवड्याभरात राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. यानंतर, काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन तर काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लावण्यात आली आहे. येत्या काही दिवसांसाठी आंदोलने, राज्यातील राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महापौर उषा ढोरे यांच्यावतीने सोमवारी चिंचवड येथे ‘फॅशन शो’ चे आयोजन केले होते. कोरोनाचे नियम कडक केले असतानाही या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नियमांचे पालन देखील झाले नसल्याचे उघडकीस आले आहे.

गेल्या वर्षी राज्यात कोरोनानारे हाहाकार माजवला होता. यावेळी. मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा अधिक प्रसार झाल्याचे निष्पन्न झाले होते. आता पुन्हा एकदा कोरोनाचे सावट गडद होत आहे. अशात, पिंपरी-चिंचवडच्या प्रथम नागरिक, महापौर उषा ढोरे यांनी देखील नियमांना बगल दिल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले नाही. इतकच नाही तर महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी रॅम्प वॉक करताना मास्क देखील घातला नव्हता.

उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यात नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश दिले आहेत. शिवाय पिंपरी-चिंचवड शहरात नाईट कर्फ्यू देखील लावण्यात आला आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांसह पालिका प्रशासन देखील कारवाई करत आहे, विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे, सामान्यांच्या कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, महापौर उषा ढोरे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला राजाश्रय असल्याने दुर्लक्षित केल्याचं दिसून आलं.

महत्वाच्या बातम्या