पिंपरी-चिंचवड : महापौरपदी राहुल जाधव तर उपमहापौर सचिन चिंचवडे लागणार वर्णी

pcmc

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून भोसरीतील नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी चिंचवड मतदार संघातील नगरसेवक सचिन चिंचवडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.या दोघांची महापौर आणि उपमहापौरपदी वर्णी लागणार हे निश्चित असून शनिवारी होणा-या विशेष सर्वसाधारण सभेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.

पिंपरीचे महापौरपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. अडीच वर्षांच्या आरक्षण कालावधीत सव्वा वर्षांचे दोन महापौर करण्याचे सत्ताधारी भाजपचे नियोजन आहे. त्यानुसार, पहिली संधी नितीन काळजे यांना मिळाली. आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांमुळे काळजे महापौर होऊ शकले. अखेर गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांसाठी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

आज (मंगळवारी) दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करायचे होते. यावेळेत सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी नगरसेवक राहुल जाधव तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक सचिन चिंचवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे.

पक्षीय बलाबल
भारतीय जनता पक्ष 77,
राष्ट्रवादी काँग्रेस 36,
शिवसेना 9,
अपक्ष 5 आणि मनसे 1

छिंदमच्या हकालपट्टीनंतर नवीन उपमहापौरांचा शोध सुरु