फुंडकर यांच्या निधनाने अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआडः अशोक चव्हाण

मुंबई- राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाने कृषी,सहकार, व ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असणारे अनुभवी व संयमी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

पांडुरंग फुंडकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त ते म्हणाले की, पांडुरंग फुंडकर कायम शेतकरी, वंचित आणि मागास घटकांच्या विकासासाठी आग्रही होते. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या पांडुरंग फुंडकर यांनी आमदार, खासदार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते, राज्याचे मंत्री म्हणून काम केले. राजकारणासोबतच कृषी, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले.

पांडुरंग फुंडकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी फुंडकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे खा. चव्हाण यांनी म्हटले आहे.