पुरोगामी पुण्यात तृतीयपंथीला नाकारला मॉलमध्ये प्रवेश; आजही ‘त्यां’चा संघर्ष सुरूच

स्त्री-पुरुष समानता, तृतीयपंथीयांना सर्वांप्रमाणे वागणूक मिळाली पाहिजे, लिंग भेदाचा निषेद या सारख्या गोष्टीचे गोडवे आपल्याकडे कायम गायले जातात. मात्र पुरोगामी म्हंटल्या जाणाऱ्या पुणे शहरात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे आजही खरंच आपण तृतीयपंथीयांना आपण समान वागणूक देतो का? याचा विचार करावा लागणार आहे.

झालं असं की, एमबीए फायनान्समध्ये उच्च शिक्षित असणाऱ्या तसेच ‘आशिर्वाद’ सामाजिक संस्थेसाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी या नगररोडवर असणाऱ्या फिनिक्स मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेल्या, मात्र दरवाज्यावर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी केवळ तृतीयपंथी आहे म्हणून त्यांना प्रवेश नाकारला. हाच व्हिडीओ तृतीयपंथी समूहासाठी काम करणारे शाम कोंनूर यांनी फेसबुकवर पोस्ट केल्यावर हा सर्व प्रकार समोर आला आहे.

याच घटनेबद्दल बोलताना सोनाली दळवी म्हणाल्या की, मी आणि माझा मित्र फिनिक्स मॉलमध्ये गुढीपाडवा खरेदीसाठी गेलो होतो, त्यावेळी सिक्युरिटी तपासणीसाठी मी महिला सुरक्षा रक्षकाकडे गेले, मात्र त्यांनी माझी तपासणी करण्यास नकार दिला. तसेच दुसऱ्या सिक्युरिटी गार्डला बोलावून घेतले. पण त्यांनी ‘आम्ही तृतीयपंथीना प्रवेश देत नसल्याचे सांगितले’, यावर मी अनेकवेळा मॉलमध्ये आल्याचे सांगितले. तरीही त्यांनी मला प्रवेश दिला नाही.

दरम्यान आम्ही कोणत्याही प्रकारचा लिंग भेद मानत नाही,मागील काही अनुभवांमुळे चेकिंगसाठी सोनाली यांना रोखण्यात आल, मात्र नंतर त्यांना प्रवेश दिला गेल्याच सांगत संबंधीत मॉलकडून सारवासारवं केली जात आहे.

सोनालीही उच्च शिक्षित असून समाजामध्ये तृतीयपंथीयांसाठी काम करणारी आहे. आज आम्ही पुण्यामध्ये राहतो कारण या शहरात आम्हाला समान वागणूक दिली जाते, मात्र फिनिक्स मॉलमध्ये तिला प्रवेश नाकारणं अत्यंत निषेधाह्य असून सरकारने याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याची भावना तृतीयपंथी समूहाचे जीवन उंचावण्यासाठी काम करणाऱ्या चांदणी गोरे यांनी व्यक्त केली आहे

एका बाजूला ज्या महाराष्ट्रामध्ये एक तृतीयपंथी सरपंच बनतो. कोणी पोलीस अधिकारी तर कोणी सामाजिक कार्य करत समाजात प्रबोधनाचे काम करत आहेत. मात्र दुसरीकडे पुण्यासारख्या पुरोगामी शहरात घडलेली घटना नक्कीच विचार करायला लावणारी आहे.