दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे निधन

Phir Hera Pheri filmmaker Neeraj Vora passes away

मुंबई  : दिग्दर्शक, लेखक आणि प्रसिद्ध अभिनेते नीरज व्होरा यांचे दीर्घ आजाराने आज पहाटे चारच्या सुमारास निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते. नीरज यांचे मित्र फिरोज नाडियावाला यांच्या जुहूमधील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नीरज व्होरा यांच्यावर आज दुपारी ३ वाजता सांताक्रुज येथे अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या निधनाबद्दल चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे. नीरज व्होरा यांना गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर मागील दहा महिन्यांपासून ते कोमात होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारत त्यांना मुंबईत आणले होते.

फिरोज यांनी नीरज यांच्यासाठी आपल्या जुहू स्थित ‘बरकत व्हिला’मधील एका खोलीचे रुपांतर अति दक्षता विभागात केले होते. नीरज यांनी फिर हेरा फेरी, खिलाडी ४२०, सारख्या सुपरहीट चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. गुजराती भाषेतील ‘आफ्टरनून’ नाटकात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. नीरज हे एक उत्तम लेखक देखील होते.

रंगीला, अकेले हम अकेले तुम, ताल, जोश, बदमाश, चोरी चोरी चुपके चुपके, आवारा पागल दिवाना सारख्या चित्रपटांसाठी त्यांनी संवाद लेखनही केले होते