दिलासादायक : फायझर भारताला देणार तब्बल ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत

pfizer

नवी दिल्ली – औषधनिर्माण क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या फायझरने भारताला ५१० कोटी रुपयांची वैद्यकीय मदत जाहीर केली आहे. फायझरच्या अमेरिका, युरोप आणि अशियातील वितरण केंद्रांवरून ही मदत भारतात पोहोचणार आहे. कोरोनाविरुध्दच्या लढाईत भारताला साथ देण्यासाठी ही मदत असल्याचे कंपनीचे अध्यक्ष अल्बर्ट बोर्ला यांनी म्हटले आहे.

अल्बर्ट बोर्ला यांनी याबाबतचा व्हिडीओ संदेश प्रसिद्ध करत भारताला सर्व प्रकारे मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये भारतातल्या प्रत्येक सरकारी रुग्णालयाला फायझर कंपनीच्या कोरोना उपचारासाठी आवश्यक असलेल्या औषधांचा पुरवठा केला जाईल,असं बोर्ला यांनी सांगितलं. यामुळं हजारो रुग्णांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

भारतातील कोरोनाच्या गंभीर स्थितीमुळे खूप वेदना होत आहे. आम्ही अगदी ह्रदयापासून तुमच्यासोबत होतो. तुमच्या कुटुंबियांसोबत आणि भारताच्या सर्व लोकांसोबत आहोत. भारताच्या कोरोनाविरुध्दच्या लढ्यामध्ये आम्ही सोबत आहोत. त्यासाठी कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी वैद्यकीय मदत गोळा केली जात आहे असे ते म्हणाले.

ही मदत लवकरच भारताला पाठवली जाईल. फायझरमधील सर्व सहकारी मदत गोळा करण्याच्या कामाला लागले आहेत.भारत सरकारने सांगितलेली सर्व प्रकारची वैद्यकीय मदत पुरविली जाईल असे ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या