पेट’च्या नोंदणीला आठ दिवसांसाठी मुदतवाढ

औरंगाबाद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे ‘पेट’च्या ऑनलाईन नोंदणीला १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी कुलगुरूंनी घेतला आहे. ३० जानेवारी २०२१ रोजी ‘पेट’चा पहिला पेपर होईल. पेट उत्तीर्ण तसेच संशोधनासाठी पात्र (सेट, नेट, एम.फिल, पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आदी) विद्यार्थ्यांची नोंदणी मार्चमध्ये तर एप्रिल महिन्यात संशोधन मान्यता समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. ४२ विषयांत ‘पेट’ होणार असून विषयनिहाय रिक्त जागा आणि गाइडची संख्याही प्रकाशित करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली आहे.

‘पेट’चा दुसरा टप्पा मार्च ते एप्रिलदरम्यान आयोजित केला आहे. या काळात ‘पेट’ उत्तीर्ण झालेले तसेच ‘पेट’मधून सूट मिळालेले दुसऱ्या टप्प्यात नोंदणी करण्यासाठी पात्र असणार आहेत. यामध्ये नेट, सेट, स्लेट, सीएसआयआर, जेआरएफ, गेट, जीपॅट, एफआयपी तसेच ‘सीईटी’ मार्फत प्रवेश घेऊन पदवी प्राप्त एम. फिल. विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल.

एक ते १५ मार्चदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल. तर २० मार्चपर्यंत विद्यापीठात हार्ड कॉपी जमा करता येईल. तसेच एप्रिल महिन्यात संशोधन व अधिमान्यता समितीच्या बैठका होणार आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.योगेश पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या