आता ऑनलाइन घरपोच मिळणार पेट्रोल-डिझेल

दिल्ली : वाढत्या पेट्रोल डिझेल च्या किमतीमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. तर विरोधी पक्ष हा मुद्दा घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. सगळीकडे या भाववाढी विरोधात जनतेच्या मनात असंतोष असताना आता पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध होतील असे संकेत दिले आहेत.

पेट्रोलियम पदार्थ ई-कॉमर्स संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या असल्याचंही धर्मेंद्र प्रधान म्हणाले आहेत. ‘सुरुवातीला जेव्हा मी या संकल्पनेबद्दल बोललो, तेव्हा असं काही होऊ शकतं याबद्दल अनेकांना शंका होती. अनेकांनी ही संकल्पना प्रत्यक्षात येईल की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. पण आता ही संकल्पना सत्यात उतरणार आहे,’ असं धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आहे. दिल्लीत झालेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये धर्मेद्र प्रधान बोलत होते. याबाबत एक ट्विट करून सुद्धा त्यांनी ही माहिती दिली आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन या पेट्रोलियम क्षेत्रातील मोठ्या कंपनीने मागील महिन्यातच याचे संकेत दिले होते. पुढील दोन महिन्यांत डिझेल घरपोच करण्यात येईल अस या कंपनीने जाहीर केले होते. पण यासाठी इंधन विपणन कंपन्यांना पेट्रोलियम संस्थांकडून काही महत्त्वाच्या परवानग्या आवश्यक आहेत.