पेट्रोल प्रतिलिटर ८.५० रुपयांनी होणार स्वस्त? मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

modi shah

नवी दिल्ली : महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. शंभरीच्या जवळ गेलेल्या पेट्रोल आणि डीझेल मध्ये सातत्याने वाढ कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते की, ‘केंद्र आणि राज्यांनी एकत्रित चर्चा करावी. त्यांनी करातील कपातीचा सल्ला दिलाय. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत ६० टक्के कर आकारला जातो. केंद्राकडून पेट्रोलच्या किमतीवर उत्पादन शुल्क आकारले जाते आणि राज्य सरकार मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट आकारते. मोदी सरकारने गेल्या १२ महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलवरील करात दोनदा वाढ केली. गेल्या वर्षी मार्च ते मे २०२० दरम्यान पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात १३ रुपये आणि डिझेलमध्ये १६ रुपयांनी वाढ करण्यात आली. सध्या पेट्रोलवर एकूण ३२.९०  रुपये तर डिझेलवर ३१.८०  रुपये प्रति लीटर उत्पादन शुल्क लागू आहे.

उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ८.५० रुपये कपात करण्याबाबत विश्लेषकांनीही मतप्रदर्शन केलंय. यामुळे महसुलावर कोणताही परिणाम होणार नाही. आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे की, ‘आमचा अंदाज आहे की, आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील वाहन इंधनावरील उत्पादन शुल्कात कोणतीही कपात केली गेली नाही, तर अंदाजे ३.२ लाख कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा ते ४.३५ लाख कोटी रुपये होईल. त्यानुसार १ एप्रिल २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी उत्पादन शुल्कातही प्रतिलिटर ८.५० रुपयांची कपात केली गेली, तर पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अंदाज गाठला येईल.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनंतर आता सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या सल्ल्याचे पालन करण्याची तयारी सुरू केलीय. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालय पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा विचार करीत आहे. गेल्या दहा महिन्यांत कच्च्या तेलाची किंमत जवळपास दुप्पट झालीय, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत गगनाला भिडत आहेत. बर्‍याच शहरांमध्ये पेट्रोल प्रतिलिटर १०० रुपयांच्या आणि डिझेल प्रतिलिटर ९० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.

महत्वाच्या बातम्या