पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही मोदी गप्प का ? : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा – केंद्रात ‘यूपीए’चे सरकार असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून आक्रमकपणे बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता मौन का धारण केले आहे?. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने नव्वदी गाठली आहे, तरीही पंतप्रधान बोलत नाहीत, ते गप्प का आहेत?, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसने आज भारत बंद पुकारला असून धरणे आंदोलनात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.

प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह देशात विरोधकांनी पुकारलेल्या भारत बंदला देशभरातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानावरून मोदी सरकावर तोफ डागताना चौफेर हल्ला केला. यावेळी १६ विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, वरिष्ठ काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.

मोदी सरकार उद्योगपतींचं कर्ज माफ करतं. मात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात, असा घणाघात राहुल यांनी केला. ‘मोदी केवळ मोजक्या व्यक्तींसाठी काम करतात. त्यांच्या मर्जीतील उद्योगपतींना कर्जमाफी मिळते. मात्र कर्जमाफीसाठी वापरला जाणारा हा पैसा मोदींचा किंवा त्या उद्योगपतींचा नाही. तो या देशातील सर्वसामान्य जनतेचा आहे. मोदी सरकार तुमच्या खिशातून पैसा चोरत आहे,’ अशी टीका राहुल यांनी केली.