‘जीवनावश्यक वस्तूंच्या सुरळित पुरवठ्यासाठी ट्रक चालक आणि मजुरांना कामाच्या ठिकाणी पोहोचू द्या’

नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोना व्हायरस दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 4281 वर जाऊन पोहोचला आहे. त्यातील 3851 सक्रिय रूग्ण असून त्यापैकी 1445 रूग्ण हे तब्लिगींच्या धार्मिक कार्यक्रमातील असून काही त्यांच्या संपर्कात आलेले आहेत.

आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या रूग्णांपैकी 76 टक्के पुरूष आणि 24 टक्के महिला आहेत. देशात COVID-19 मुळे आतापर्यंत 109 लोकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावलेल्या संचारबंदी दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा याकरता ट्रक चालक आणि मजुरांना आपापल्या कामाच्या जागी पोचायला अडचण होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

याकरता पोलीसांच्या समन्वयासाठी विशेष नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी असं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव पवनकुमार अग्रवाल यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना लिहीलेल्या पत्रात सांगितलं आहे.

भारतीय खाद्य महामंडळानं दोन दिवसांमध्ये एक लाख 93 हजार मेट्रिक टन धान्याचा पुरवठा करून नवा विक्रम स्थापित केला आहे. संचारबंदीच्या काळात देशाच्या सर्व भागांमध्ये अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी मुबलक साठा उपलब्ध असल्याचं भारतीय खाद्य मंडळानं सांगितलं आहे.

संचारबंदी सुरू झाल्यापासून आतापर्यंत सतरा लाख टनधान्याचा पुरवठा केला असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सांगितला आहे. पंजाब, हरियाणा, तेलंगाना, छत्तीसगढ या राज्यांनी धान्य पुरवठ्यात मोठं योगदान दिलं असून उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आणि कर्नाटक या राज्यांना धान्य पुरवठा झाला आहे.