#Haidrabadencounter : न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होतोय, उज्वल निकामांनी व्यक्त केली चिंता

टीम महाराष्ट्र देशा : हैद्राबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा झाला आहे. तेलंगणा पोलिसांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या याचारही आरोपींचा जागीच एन्काऊंटर केला आहे. पोलिस चौघांनाही ज्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार करुन तिला जाळण्यात आलं, त्या घटनास्थळी घेऊन गेले होते. मात्र तिथे या चौघांनी पळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी या चारही आरोपींना जागीच संपवलं आहे.

तेलंगणा पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे समाजातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. सामान्य नागरिक म्हणून हैद्राबाद पोलिसांनी केलेली कारवाई ही योग्य आहे. पण कायद्याच्या चौकटीतून पाहिले असता याला काही मर्यादा आहेत, असे म्हणत ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो किंवा पोलिसांवर उलट हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला जखमी करण्यची तरतूद कायद्यामध्ये करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार पोलीस कंबरेखाली गोळी घालून जखमी करू शकतात. मात्र थेट ठार मारता येत नाही, असे निकम म्हणाले.

तसेच आज पोलिसांच्या कारवाईचे ज्या पद्धतीने जनमानसात स्वागत होत आहे. त्यावरूनच एक दिसून येते की देशातील नागरिक आता न्यायालयाच्या रटाळ प्रक्रियेला कंटाळले आहेत. तातडीने कारवाई व्हावी, सुनावलेल्या शिक्षेची अमलबजावणी तातडीने व्हावी अशी मागणी सामन्य नागरिकांकडून होते आहे. न्याय व्हावा असेच सामन्य नागरिकांना वाटत असते, त्यामुळे आजची येणारी प्रतीक्रिया ही स्वाभाविक आहे, असेही उज्वल निकम म्हणाले.

तर दिल्ली प्रकरणातील निर्भायाच्या आईने दहा दिवसांत न्याय मिळाला, असे म्हणत पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या की, पीडितेच्या कुटुंबाला दहा दिवसांत न्याय मिळाला, आमच्याप्रमाणे हैदराबादमधील पीडित कुटुंबाच्या वाट्याला संघर्ष आला नाही, याचं समाधान आहे. असल्या गुन्हेगारांना अशीच शिक्षा केली पाहिजे. मात्र आपली न्याय व्यवस्था ही गुन्हेगारांना पोसत बसते. पोलिसांना अशा गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे. अशाचं कारवाया करून असे गुन्हेगार संपवले पाहिजेत.

दरम्यान तेलंगणाच्या राजधानीजवळील शादनगर गावात 7 नोव्हेंबरला एक धक्कादायक प्रकार घडला होता. अज्ञात लोकांनी वेटरनरी महिला डॉक्टरवर बलात्कार करून पेटवून ठार मारले होते. या घटनेनंतर दोषींना लवकरात लवकर फाशीच्या शिक्षेची मागणी होत होती. त्यासाठी देशभरात आंदोलनं होतं होती. मात्र आज या आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. तेलंगणा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे देशातून पोलिसांचे आणि तेलंगणा सरकारचे कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या