भाजपला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही : जयंत पाटील  

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी साधला संवाद

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात खदखदणाऱ्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यातील जनतेचा सरकारविरोधातला रोष त्यांच्या प्रश्नांच्या माध्यमातून समोर आला. देशाची हलाखीची आर्थिक परिस्थिती, रुपयाचे अवमूलन, इंधनाचा भडका, महागाई, घटलेली परदेशी गुंतवणूक, वाढती बेरोजगारी, कर्जमाफीची फसवी आश्वासने, गॅस सबसिडी, आरक्षणाचे पोकळ दावे, अशा अनेक मुद्द्यांवर पाटील यांनी थेट भाष्य करत सरकारवर ताशेरे ओढले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारविरोधात ‘५६ इंचाच्या छातीवाल्यांसाठी ५६ प्रश्न’ ही नवी मोहीम फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून सुरू केली आहे. या अंतर्गत #जवाबदो वापरून फेसबुक आणि ट्विटरवदेखील राज्यातील लोक आपले प्रश्न थेट विचारू शकतात, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले. जनतेने विचारलेल्या या प्रश्नांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे उत्तरे नाहीत, त्यामुळे आगामी काळात जनता यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यभरातून या फेसबुक संवादाला उत्तम प्रतिसाद लाभला. पक्षाच्या आगामी काळातील योजनांबद्दल आणि रणनितीबाबत यावेळी विचारणा करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये सर्व समविचारी पक्षांना सोबत घेऊन सरकारविरोधात उभे ठाकणार असल्याचे, तसेच युवकांना संधी देऊन, पक्षातील गटबाजीबाबत कठोर पावले उचलणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच २०१९ मध्ये जसे रूपयाचा भाव शंभरी गाठेल, पेट्रोलचे दर शंभरी गाठतील त्याप्रमाणेच भाजपच्या खासदारांची संख्याही घटून शंभरीवर येईल, असा टोला पाटील यांनी लगावला.