कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत; संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य

bhide guruji

सांगली – देशात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली आहे. त्यात काही ठिकाणी वाढत्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरवताना शासन आणि प्रशानसनावर प्रचंड ताण येत आहे. सरकारी यंत्रणा हतबल ठरत आहेत. वाढत्या मृत्यूदराबरोबरच भीतीही वाढत आहे.

अवघे जग या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी कोरानाची साथ आणि कोरोनाबळींबाबत वादग्रस्त विधान केले आहे.कोरोना हा आजारच नाही. तो मानसिक रोग आहे. कोरोनाने माणसे मरतात, ती जगण्याच्या लायक नसतात, असे वादग्रस्त विधान संभाजीराव भिडे यांनी आज येथे केले आहे. भिडे यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

सांगली जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात भिडे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली.ते म्हणाले, ‘केंद्र आणि राज्य शासन लोकांना उल्लू बनवत आहे. त्यांना काहीच कळत नाही. मास्क लावायची गरज आहे का? एकीकडे दारू सुरु आहे, लोक गांजा ओढत आहेत. अफू सुरु आहे, मग मास्कने काय होणार आहे असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

एवढ्यावरच न थाबता भिडे यांनी कोरोनाच्या अस्तित्वावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले,मुळात कोरोना अस्तित्वात आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे. तो मानसिक आजार आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला अजिबात अक्कल नाही’ असं म्हणत सरकारवर देखील तोफ डागली.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी याआधी एका कार्यक्रमात चक्क आमदारालाच मास्क काढायला लावला होता.त्यावेळी देखील मोठा वाद निर्माण झाला होता. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला. करोना होत नाही मास्क काढा असं सांगितल्यावर बाबर यांनीदेखील मास्क काढून टाकला होता.

दरम्यान, महाराष्ट्रात काल राज्यात 59907 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 30296 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2613627 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 501559 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.36% झाले आहे.

महत्वाच्या बातम्या