Share

Explained | एकनाथ शिंदे यांना विरोध वाढला ; भाजपची खेळी अयशस्वी

राज्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असा वाद पेटला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडत भाजपच्या पाठींब्याने राज्यात सरकार स्थापन केले. हे सर्व कटकारस्थान रचण्यात भाजप आघाडीवर होता. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी बंडादरम्यान मदत केल्याचे एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले होते. कारण २०१९ पासून अमित शहा उद्धव ठाकरे यांचा काटा काढण्याची वाट पाहत होते. शिंदे मार्गाने ते शक्य झालं. शिवसेना फोडल्यानंतर हे शांत बसले नाहीत तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर आपला दावा केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा गट देखील चांगलाच आक्रमक झाला. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे शिवसेना पक्ष व चिन्ह धनुष्यबाणावर दावा केला. शिवसेनेने देखील आपले उत्तर दाखल केले. यानंतर आयोगाने पक्षाचे नाव व चिन्ह गोठवले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांनी रक्ताचे पाणी करुन उभी केलेली शिवसेना भाजपने एकनाथ शिंदेंच्या मदतीने संपवली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंना विरोध वाढला आहे.

बंड केला तोपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना काबिज करण्याचा प्रयत्न केला तेव्हापासून त्यांची प्रतिमा समाजात मलिन होत आहे. सामान्य लोक देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत. राजकाराणापासून दूर असलेले लोक देखील उद्धव ठाकरे यांच्यावर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. तर शिंदे सरकारला खोके सरकार म्हणून डिवचत आहेत. ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा नागरिक देत आहेत. शिंदे गटातील आमदारांना उद्धव ठाकरे व शिवसेनेला धोका दिल्याचा जाब लोक विचारत आहेत. मंत्री उदय सामंत यांच्यावर पुण्यातील कात्रज परिसरात हल्ला झाला होता. तर आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. यासोबतच ‘५० खोके, एकदम ओके’चा नाराही देण्यात आला. यावरुन शिंदे गटातील आमदारांप्रती कट्टर शिवसैनिकांमध्ये रोष असल्याचे सिद्ध होते. हा रोष कायम राहीला तर शिंदे गटातील आमदार पुन्हा निवडणून येणार नाहीत, अशी चर्चा आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना मोठा प्रतिसाद-

दसरा मेळाव्यात ४० आमदार फुटूनही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन्ही गटांकडे गर्दी होती पण शिंदे गटातील गर्दी शेवटपर्यंत टीकली नाही. तसेच इतर राज्यातून, पैसे देऊन लोक गोळा केल्याचा आरोप शिंदे गटावर झाला याबाबत, अनेक माध्यमांनी खुलासे देखील केले आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांनी भाषण वाचून काढल्यामुळे समाजात त्यांच्याप्रती असलेला विश्वास कमी झाला. शिंदे भाजपचे मुख्यमंत्री असल्याची टीका होत आहे. शिंदे गटातील अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप देखील आहेत. पण ज्याप्रमाणे विरोधकांची चौकशी होते, तशी चौकशी शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांची होत नाही. त्यामुळे भाजपचा प्रशासकीय यंत्रणांवर दबाव असल्याची टीका होत आहे. अनेक स्वायत्त संस्था देखील भाजपने आपल्या ताब्यात घेतल्या आहे. शिवसेनेने तर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हे नागरिकांच्या देखील लक्षात आले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत शिंदे गटाला फटका बसेल आणि भाजप सावधरीत्या बाहेर पडेल. मात्र शिंदे गटाचे अस्तित्व धोक्यात येईल.

हेही वाचा – Explained | तर शिंदे गटाचे ४० आमदार निवडून येणे कठीण, अस्तित्वाचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंनी जिंकला

शिंदे गटातील मंत्र्यावर आरोप-

एकनाथ शिंदे यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव खतगावकर यांना शिवीगाळ केल्यामुळे चर्चेत असलेले कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीईटी घोटाळ्याचा आरोप आहे. शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) २०१९-२० मध्ये कथित गैरवर्तनासाठी अपात्र ठरलेल्या ७८८० उमेदवारांच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या पाल्यांचे नाव समोर आले होते. नंतर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने चौकशीची मागणी केली होती. मात्र परिस्थिती जैसे-थे आहे. तसेच सत्तार यांच्या मुलीला अपात्र असताना देखील सन २०१७ पासून वेतन सुरू असल्याची माहिती समोर आली होती. नावात सत्ता असलेले सत्तार तरी देखील हे आरोप मोठ्या हिंमतीने फेटाळतात कारण त्यांच्या पाठीशी महाशक्ती असल्याचा विश्वास त्यांना आहे. सत्ता तिकडे सत्तार असे समिकरण आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असतांना अब्दूल सत्तार यांच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी सत्तार यांनी माफीनामा देखील लिहून दिला होता.

हेही वाचा- Explained | उद्धव ठाकरेंशिवाय शिंदे गटातील मंत्र्यांचे राजकीय भविष्य धोक्यात? पुढे निवडून येणेही अवघड

सत्तारांच्या पाठीशी येतात ते रोहयो मंत्री संदिपान भुमरे. स्वत:च्या मतदार संघात विकासाचा दुष्काळ असलेले भुमरे यांच्याप्रती त्यांच्या मतदार संघात प्रचंड नाराजी आहे. गायरान जमीन मुलाच्या नावे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच भुमरे यांच्या मतदारसंघातील महत्वाकांक्षी ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजनेचे कंत्राट भुमरे यांच्या जावयाला मिळाल्याचा आरोप आहे. या योजनेचं कंत्राट ज्या कंत्राटदाराला मिळाले आहे, त्याच्याकडून भुमरे यांच्या जावयाने रजिस्ट्री करून घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. मात्र हा आरोप भुमरेंनी फेटाळला होता. जावई कंत्राटदार आहेत, त्यांना आधीच हे कंत्राट मिळाल्याचे भुमरे म्हणाले होते. सासरे मंत्री आणि कंत्राट जावयाला हे लोकांना पचले नाही. त्यामुळे येणारी निवडणूक भुमरेंसांठी धोक्याची घंटा आहे.

टीईटी घोटाळ्याचा आरोप असलेले अब्दुल सत्तार हे भुमरे यांच्या मदतीला आले होते. भुमरेंच्या जावयाला कंत्राट मिळाले तर त्यात वावगे काय? त्यांनी काम घेऊ नये का? जावयाला कंत्राट मिळाले म्हणून आक्षेप घेण्यात काय अर्थ?, असे म्हणत अब्दुल सत्तार यांनी भुमरे यांना पाठींबा दिला होता, त्यामुळे शिंदे गटातील हे दोन मंत्री नगास-नग असल्याची टीका होत आहे. ज्यांचे शिंदे गाटातील मंत्री आदराने नाव घेतात ते आनंद दीघे यांचे बँकेत साधे खाते नव्हते. मात्र हे मंत्री समाजाचा विकास सोडून स्वत:चे घर पुढे नेते आहेत. नगरसेवक झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात कार घेतल्यामुळे आनंद दिघे यांनी नगरसेवकाला चांगलेच चोपले होते. मात्र आता अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरेंचे एकनाथ शिंदे काय करतील?, असा प्रश्न निर्माण होत आहे.

शिंदे सराकारने आणखी एक असा निर्णय घेतला की लोकांनी डोक्याला हात लावला. एका मुलीवर अत्याचार केला म्हणून भाजपच्या दबावापोटी महाविकास आघाडीने राजीनामा घेतलेले संजय राठोड यांना एकनाथ शिंदेंनी मंत्री केले. संजय राठोड यांच्यावर पुण्यात गुन्हा देखील दाखल केला होता. मात्र पोलिसांनी त्यांना क्लिनचीट दिली. मात्र भाजपने त्यांना मंत्री म्हणून कसे स्विकारले? , ही सत्तेसाठी लाचारी आहे का?, असा प्रश्न चर्चेत आहे.

ईडी सरकार म्हणून टीका-

शिंदे गटातील अनेक नेत्यांवर ईडी चौकशीची ससेमिरा लागली होती. भाजप नेते किरीट सोमय्या तर या नेत्यांच्या मागे हात धवून लागले होते. मात्र भाजपसोबत हातमिळवणी करताच चौकशीचे दारे बंद झाले. यामध्ये आमदार प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, खासदार भावना गवळी यांचा समावेश आहे.

प्रताप सरनाईक ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जायचे. कथित एनएससीएल घोटाळ्याप्रकरणी सरनाईक ईडीच्या रडारवर होते. त्यांची मालमत्ता देखील ईडीनं जप्त केली होती. दरम्यान हे प्रकरण शांत आहे. तसेच शिंदे गटातील आमदार यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. यशवंत जाधवही आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या रडारवर होते. आयकर विभागाने जाधव यांच्यावर छापेमारी देखील केली होती. यात ४० प्रॉपर्टी जप्त केल्या होत्या. ईडीने जाधव यांना मनी लॉंडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नोटीस देखील बजावली होती. या प्रकरणात सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते.

हेही वाचा- Explained | शिंदे गटाला जनसामान्यांमधून विरोध का? एकनाथ शिंदेंनी विश्वासार्हता गमावली?

शिंदे गटात असलेल्या खासदार भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमधील गैरव्यवहार प्रकरणी देखील ईडीने नोव्हेंबर महिन्यात आरोपपत्र दाखल केलं होते. त्याची 3.5 कोटी रूपयांची मालमत्ता देखील ईडीने तात्पुरती जप्त केली आहे, मात्र त्या शिंदे गटात गेल्यापासून आणि भाजपला पाठींबा दर्शवल्यापासून हे प्रकरण शांत आहे. यामुळे हे ईडीचे सरकार असल्याची टीका होत असते.

तर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री निवडून येणार नाही-

शिंदे गटातील मंत्री, आमदार, खासदार उद्धव ठाकरे यांची साथ नसेल तर निवडणून येणार नाहीत, असा अंदाज राजकीय वतर्तुळात लावला जात आहे. शिवसेना आणि ठाकरे असे समिकरण राज्यात आहे. जसे भाजप म्हटंल की मोदी-शहा, राष्ट्रवादी म्हटलं की पवार, काँग्रेस म्हटंल की गांधी तसे शिवसेना म्हणजे ठाकरे. त्यामुळे कितीही शिवसेनेवर दावा केला तरी बंडखोर आमदारांना पुन्हा निवडणून येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मोतोश्रीची साथ लागेल.

राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याप्रती सहानुभूती आहे. उद्धव ठाकरेंनी देखील दसरा मेळाव्याच्या भाषणातून वातावरण निर्मिती केली. खोके सरकार, भाजप आणि शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांच्या बाजूने वातावरण तयार झाले आहे. शिंदे गटाला कोणीही पाठींबा दिला तरी भावनिक दुष्ट्या लोक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत.

आदित्य महाराष्ट्राचे जगमोहन रेड्डी होणार?

आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. त्यांनी शिंदे गटावर चौफेर टीका केली. लोकांनी देखील आदित्य ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आदित्य ठाकरे उद्याचे जगमोहन रेड्डी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर निष्ठा यात्रा काढली. जगनमोहन रेड्डी यांनी वडिलांच्या मुत्यूनंतर संघर्ष करत आपला स्वतःचा एक वेगळा पक्ष स्थापन करून आंध्रप्रदेशमध्ये एकहाती सरकार स्थापन केलं. जगनमोहन रेड्डी यांचे वडील वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसकडून अपमान आणि बेहिशेबी संपत्तीप्रकरणी तुरुंगवास यासह अनेक चढ उतार पाहणाऱ्या जगनमोहन रेड्डींनी अखेर मोठं यश मिळवलं होतं. दरम्यान जगनमोहन रेड्डी यांची तुलना आदित्य ठाकरे यांच्यासोबत होत आहे.

हेही वाचा – Aditya Thackeray | कोण रोखणार आदित्य ठाकरेंचा झंझावात? आदित्य महाराष्ट्राचे जगमोहन रेड्डी होणार?

भाजपसाठी धोक्याची घंटा-

पक्षात मोठा बंड होऊन देखील उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे डगमगले नाही. त्यांनी मोठ्या हिमतीने या परिस्थितीचा सामना केला. शिवसेना संपणार असे चित्र महाराष्ट्रात होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी जोमाने लढा देत लोकांना आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे याचा फटका भाजपला देखील बसू शकतो. एक पक्ष संपवण्यासाठी भाजपची असलेले तळमळ सर्वांना दिसत आहे. देशात ऑपरेशन लोटससाठी भाजप आधिच चर्चेत आहे. मात्र शिवसेना फोडल्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे. राष्ट्रीय राजकारणात देखील याचा फटका भाजपला बसू शकतो. महाराष्ट्रात भाजपने फक्त सत्ता मिळवली नाही तर एक पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण देशात चर्चेत आहे. उद्या शिवसेना मोठी भरारी घेईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. असे झाले तर शिवसेना सारख्या प्रादेशिक पक्षाने मोठी भरारी घेणे हे भाजपसाठी धोकादायक असेल. इतर राज्यात देखील याचे परिणाम दिसू शकतात.

महत्वाच्या बातम्या :

राज्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असा वाद पेटला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील ४० आमदार फोडत भाजपच्या पाठींब्याने राज्यात …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now