लोकांना उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नाही, म्हणून ते फडणवीसांना मुख्यमंत्री मानतात-चंद्रकांत पाटील

मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर येथे आमदार मंदा म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक राजकीय चर्चांना उधाण आणणारे वक्तव्य केले. ‘मला एकही दिवस जाणवले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. मला आजही असे वाटते की मी मुख्यमंत्रीच आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले होते.

‘तुमच्यासारखे नेते पाठीशी, सोबत असल्यामुळे मला एकही दिवस वाटले नाही की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नाही. मला आजही असे जाणवते की मी मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. शेवटी मनुष्य कुठल्या पदावर आहे हे महत्वाचे नाही. तो काय करतो हे महत्वाचे आहे. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेत आहे. त्यामुळे जनतेनेही मला जाणवू दिले नाही. मला आशीर्वाद मिळेल त्यावेळी मी याचठिकाणी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याचा नेहमीप्रमाणे काहीतरी चुकीचा अर्थ लावला गेलेला आहे. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की, आजही जनता मी मुख्यमंत्री असल्यासारखीच अपेक्षा करते. जे त्यांना मराठवाड्याच्या दौऱ्यात जाणवले. गावागावांमध्ये लोक म्हणायचे साहेब तुम्ही असायला पाहिजे होतात’.

‘यावरून त्यांना असं वाटतं की आजही मला लोकांमध्ये गेल्यानंतर असे वाटते की मुख्यमंत्री आहे. कारण लोकांना उद्धव ठाकरेंकडून अपेक्षा नाही आहेत. ते बाहेर पडणार नाहीत हे त्यांनी गृहीत धरले आहे. प्रत्येक वेळेला जीवाचा आकांत करुन देवेंद्र फडणवीस फिरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना असे वाटते की साहेब तुम्ही मुख्यमंत्री नसलात तरी आम्हाला मुख्यमंत्रीच वाटता. कारण तुम्ही आम्हाला त्या त्या वेळेला मदत केली. ही लोकांची भावना आहे त्याला काय करायचे’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या