लोकांना खायला अन्न नाही आणि मोदी म्हणातात योग करा- अशोक चव्हाण

narendra modi and ashok chawan

देशात भ्रष्टाचार, जातीयवाद बोकाळला आहे. शेतकरी दररोज आत्महत्या करित आहेत. गोर गरिब लोकांना दोनवेळचे अन्न पोटाला मिळत नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला योग करायला सांगत आहेत अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आज औरंगाबाद येथे औरंगाबाद शहर व ग्रामीण जिल्हा बुथ कमिटी समन्वयकांची बैठक आणि पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना खा. चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणावर जोरदार टीका केली. महागाई, शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफी, वाढलेला जातीय तणाव ही संकटे आज देश आणि राज्यासमोर आहेत. देशातली शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, दलित अल्पसंख्यांक असे सर्वच घटक संकटात आहेत, त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान योग करायला सांगत आहेत. राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, लोक किडे-मुंग्या प्रमाणे मरतायेत पण सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा एक वर्षापूर्वी सरकारने केली होती पण अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. बाजार समित्या समोर शेतकरी हरभरा, तूरीच्या गाड्या घेऊन उभे आहेत पण त्याची खरेदी केली जात नाही. पेरणी तोंडावर आली तरी शेतकऱ्याला अजून पीक कर्ज मिळत नाही, पीक विम्याचे पैसे देखील मिळालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी अडचणीत सापडला आहे. शेतक-यांना संकटात टाकणा-या या सरकारला याचा जाब सरकारला विचारला पाहिजे. शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांसमोर गावागावात जाऊन मोर्चे काढा. एकीकडे नीरव मोदी, विजय माल्या सारखे उद्योगपती कोट्यावधींचे कर्ज घेऊन विदेशात पळून गेले आणि इकडे शेतकऱ्यांना मात्र कर्ज मिळत नाही असा भाजप सरकारचा कारभार आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

भाजपच्या नेत्यापासून आपल्या मुली सुरक्षित नाहीत- अशोक चव्हाण

जळगाव जिल्ह्यात विहिरीत पोहणाऱ्या दलित समाजातील मुलांना नग्न करून मारहाण झाल्याची घटना भयानक आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राची परिस्थीती आता युपी बिहार सारखी झाली आहे. त्या मुलांना मारहाण करून त्याचा व्हिडीओ वायरल करणा-यांविरोधात कारवाई करण्याऐवजी बालहक्क आयोगाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस पाठवली. हा सगळा प्रकार मुळ मुद्द्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी केला जात आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

आगामी निवडणुकीत आपल्याला आरएसएस, भाजप, शिवसेने सारख्या शत्रूंशी लढा द्यावा लागणार आहे. आरएसएस गावागावात जातीवादाचे विष पेरत आहे. त्यांना रोखण्याचे काम काँग्रेस कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे. विदेशातून काळा पैसा आणू, दाऊदच्या मुसक्या बांधून आणण्याची भाषा करणारे पाकिस्तानातून साखर घेऊन आले आहेत. त्यामुळे देशातील साखरचे भाव पडले आहेत. भाजप सरकारला कसलेही तारतम्य राहिलेले नाही असे खा. चव्हाण म्हणाले.

एका महिन्याच्या अंतरात दोघे भाऊ विधानपरिषदेवर !

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...