कोल्हापुरातील लॉकडाऊनवर सामान्यांचा राजकीय नेत्यांवर अनोख्या पद्धतीने रोष !

kolhapur

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. राज्यासह जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेता ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सत्ताधारी गटाने केली होती. मात्र, विरोधी गट निवडणूक घेण्यावर ठाम होता.

अखेर २ मे रोजी निवडणूक पार पडली असून आज मतमोजणी पार पडत आहे. गोकुळच्या निवडणुकांमध्ये चुरशीने 99.78 टक्के इतकं मतदान झालं आहे. मात्र, यावेळी सोशल डिस्टंसिंग व इतर कोरोना नियमांना हरताळ फसल्याचे दिसून आले. आता याचे परिणाम उमटू लागले असून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे.

यापार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज तडकाफडकी कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या सकाळी ११ वाजल्यापासून ते १५ मे पर्यंत १० दिवसांचा कडक लॉकडाऊन कोल्हापूर जिल्ह्यात करण्यात आला आहे. या निर्णयानंतर सामान्य कोल्हापूरकरांनी देखील नाराजी व्यक्त केली असून निवडणूक झाल्यानंतरच लॉकडाऊन का ? याआधी गरज असताना राजकीय फायद्यासाठी टाळाटाळ केली का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमांमध्ये राजकीय नेत्यांच्या समर्थकांच्या पोस्ट पसरत होत्या. मात्र, आता निवडणूक झाल्यानंतर कडक लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सामान्य कोल्हापूरकरांनी विविध व्हाट्सऍप स्टेटस वरून राजकीय नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हे स्टेटस आता चांगलेच व्हायरल होत आहेत. राजकारण्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे दूधसंघाच्या निवडणूका पार पाडल्या. याकाळात सामान्य नागरिकांच्या अडचणींवर दुर्लक्ष केले गेले. आता राजकीय नेत्यांमुळेच कोरोना फोफावल्यानंतर कडक नियम लादले जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या