२ ऑक्टोबर ला पेन्शन दिंडी निघणार

 मुंबई : गेले तीन वर्षे जुनी पेन्शन योजना लागू करावी म्हणून सरकारच्या विरोधात आंदोलने, मोर्चे करून आक्रोश करणारी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना येत्या २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त सरकारला जाग आणण्यासाठी पेन्शन दिंडी काढणार आहे.! ठाणे तीन हात नाका ते मुंबई मंत्रालय अशी ही पेन्शन दिंडी होणार असून त्यांनतर मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत मंत्रालयाला घेराव घालणार असल्याची माहिती संघटनेचे मुख्य राज्य संपर्क प्रमुख तथा मीडिया प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील यांनी दिली.

संघटनेचे शिष्टमंडळ सध्या चालू असलेल्या विधीमंडळ अधिवेशनदरम्यान आपल्या मागण्याचा पाठपुरावा करण्यासाठी विधानभवनात होते. १ नो. २००५ नंतर नोकरीस लागलेल्या सरकारी, निमसरकारी, सरकारशी संलग्नित स्वायत्त संस्था यातील कर्मचारी यांना सरकारने जुनी पेन्शन योजना नाकारली असून, त्यांना अन्यायकारक नवीन पेन्शन योजना लागू केली आहे, त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये या बाबत नाराजीचा सूर आहे, असे संघटनेचे योगेश थोरात यांनी सांगितले.

या विरोधात नागपूर अधिवेशनावरील आक्रोश मोर्चे, मुंबई अधिवेशनवरील मुंबईचे धरणे अश्या ५० हजाराहून अधिक मोठया संख्येचे आंदोलन संघटनेने केले आहेत. मुंबईतील आंदोलनाची दखल घेऊन नामदार दिपक केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सरकारने मृत कर्मचारी यांच्या कुटुंबाला १० लाख देण्याची घोषणा केली परंतु सेवेच्या सुरवातीच्या दहा वर्षात जर कर्मचारी मयत झाला तरच त्याला सरकारकडून १० लाख रु मदत मिळणार असल्याची अट त्यात टाकल्याने व कुटुंब निवृत्तीवेतन देण्याऐवजी अशी मदत देऊन पुन्हा सरकार चेष्टा करत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने आता आर-पारची लढाई करण्याचे संघटनेच्या बैठकीत ठरले असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली.

त्या दृष्टीने २ ऑक्टोबर रोजी ठाणे ते मुंबई पेन्शनदिंडी व ३ ऑक्टोबर पासून बेमुदत मंत्रालय घेराव करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राज्य सचिव गोविंद उगले यांनी दिला आहे. जवळपास लाखाच्या घरात किंवा त्याहून अधिक कर्मचारी मंत्रालय घेराव करण्याच्या या आंदोलनात सहभागी होतील, अशी खात्री कोकण विभागप्रमुख अमोल माने यांनी व्यक्त केली.

सर्वांनी या दृष्टीने नियोजनाला सुरवात करावी असे आवाहन शिवाजी खुडे, आशुतोष चौधरी, सुनील दूधे, नवनाथ धांडोरे, गौरव काळे, विष्णू आडे, बाजीराव मोढवे यांनी केले आहे. सर्व कर्मचारी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत असल्याची भावना राजू ठोकळ, प्रवीण पाताडे, उमेश पडावी, नितीन तिडोळे, राजेंद्र फुलवरे, विजय उदार , विनोद लुटे आदींनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यां संदर्भात योग्य निर्णय घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे