fbpx

खासदार -आमदारांना पेन्शन चालते तर मग शासकीय कर्मचाऱ्यांना का नको ?

 प्रा. प्रदीप मुरमे : देशातील खासदार व आमदारांना पेन्शन चालू आहे.परंतु शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून शासकीय कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे.खासदार -आमदार यांना एक न्याय तर कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय देवून शासनाने दुजाभाव केला आहे. त्यामुळे राज्य घटनेला अभिप्रेत असलेली न्याय व समता कुठे आहे ? असा संतप्त सवाल शिक्षक नेते शिवाजीराव साखरे (वाघ) यांनी उपस्थित केला.

निलंगा (जि. लातूर ) येथे आयोजित डॉ. ना. य. डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या प्रसंगी ते बोलत होते.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे ,उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार विक्रम देशमुख,नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, सभापती अजित माने,संजय दोरवे,प्रकाश देशमुख,गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार,गटशिक्षण अधिकारी रविंद्र सोनटक्के,शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष किशनराव बिरादार,सरचिटणीस संजय सूर्यवंशी आदींची यावेळी उपस्थिती होती. पुढे बोलताना साखरे म्हणाले की,राज्यातील शिक्षकांच्या विविध समस्या आहेत. ना. पाटील साहेबांनी या समस्या शासन दरबारी मांडून शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा. डॉ. डोळे पुरस्काराच्या माध्यमातून शिक्षक समिती कृतिशील व मूल्याधिष्टीत शिक्षकांचा गौरव करण्याचे कौतुकास्पद काम करत असल्याचे साखरे म्हणाले

शिक्षक समितीचे आपण पालकत्व स्वीकारले असल्यामुळे शिक्षकांचे वकीलपत्र यापुढे मी घेतले आहे. त्यामुळे शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवून शिक्षकांना न्याय देणार. काँग्रेस व भाजप सरकारचा तुलनात्मक अभ्यास केल्यास भाजपने मोठे काम केले आहे. आपले पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस बलशाली भारत निर्माण करण्यासाठी मोठी कामे करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून राजकारणात आपण काम करत असल्याचे ना. निलंगेकर यावेळी बोलताना म्हणाले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना यावेळी गौरवण्यात आले. ना. पाटील यांच्या हस्ते शिक्षक समितीचे नूतन तालुकाध्यक्ष संजय कदम तर सरचिटणीस गणेश गायकवाड यांना निवडीचे पत्र देण्यात आले. प्रास्ताविक अरुण सोळूंके,आभार संजय कदम तर सूत्रसंचालन सतीश हानेगावे यांनी केले.

2 Comments

Click here to post a comment