बलात्कार प्रकरणातील आरोपीला मटणाची पार्टी देण्याचा दंड!

राज्य महिला आयोगाने गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना यासंबंधीचा कार्य अहवाल पाठवण्याचे निर्देश

गडचिरोली: बलात्कार प्रकरणातील आरोपीला जातपंचायतीने मटणाची पार्टी देण्याचा दंड ठोठावल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून यासंबंधीचा कार्य अहवाल पाठवण्याचे निर्देश राज्य महिला आयोगाने गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. पोलिसांनी जातपंचायतीच्या पाच जणांना अटक केली आहे.

पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर अनिल मडवी या नराधमाने बलात्कार केला होता. या नराधमाने मुलीला घरी सोडतो असे सांगत तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. घरी परतल्यावर मुलीने आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. आई-वडिलांनी पोलिसांकडे जाण्याऐवजी हे प्रकरण जातपंचायतीकडे नेले. जातपंचायतीने अनिलला गावाला मटण पार्टी देण्याचा आणि पीडित मुलीला उपचारासाठी १२ हजार रुपये देण्याचा दंड सुनावला. तिकडे उपचार न मिळाल्याने पीडित मुलीची प्रकृती खालावली. आई- वडिलांनी हे प्रकरण पुन्हा जात पंचायतीसमोर आणले. जातपंचायतीच्या पंचांनी आई-वडिलांना पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हा सदर प्रकार समोर आला आहे.