स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाळ बुधवारी ‘ड्रॉ’द्वारे संपुष्टात

pcmc-main

पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची फेब्रुवारीअखेर मुदत संपणार आहे. समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. त्यांची नावे बुधवारी होणा-या स्थायी समितीच्या सभेत ‘ड्रॉ’व्दारे काढली जाणार आहेत. त्यामुळे कोणत्या नगरसेवकांना समितीतून बाहेर पडावे लागते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कोणते नगरसेवक लकी ठरतात आणि कोणते अनलकी ठरतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. फेब्रुवारीच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे बुधवारी होणा-या स्थायी समिती सभेत ‘ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. स्थायी समिती सभापतींच्या अध्यक्षतेखाली होणा-या सभेत आठ सदस्यांच्या नावाचा चिठ्ठी काढली जाईल व ते समितीतून बाहेर पडतील. ज्या पक्षाचे जेवढे सदस्य बाहेर पडतील तेवढेच पुन्हा नव्याने स्थायीत घेतले जाणार आहेत. त्यांची घोषणा या महिन्याच्या पालिका सभेत केली जाणार आहे.

स्थायी समितीमध्ये अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, प्रा. उत्तम केंदळे, उषा मुंडे, माधुरी कुलकर्णी, हर्षल ढोरे, निर्मला कुटे, कोमल मेवाणी (भाजप), राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ, शिवसेनेचे अमित गावडे आणि अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे सदस्य आहेत. त्यापैकी आठजणांची चिठ्ठी निघेल. त्यानंतर नवीन आठ सदस्यांची फेब्रुवारी महिन्याच्या महासभेत निवड केली जाणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा याप्रमाणे पन्नास नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे भाजपकडून विद्यमान दहा सदस्यांना स्थायी समिती सदस्यपदाचा राजीनामा द्यायला लावून नवीन दहा सदस्यांना संधी दिली जाऊ शकते.

5 Comments

Click here to post a comment