#सर्वांनी दिला भूमीपुत्रांचा नारा, तरी पवार म्हणतात परप्रांतीय मजुरांनाचं परत आणा !

sharad pawar

अनिकेत निंबाळकर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने परराज्यातून आलेले मजूर हे परत गेले आहेत. मात्र आता राज्य सरकारने काही भागातील उद्योग सुरु केले आहेत. मात्र कामगारांन अभावी अनेक उद्योगधंदे अजूनही सुरळीत सुरु झालेले नाहीत. त्यामुळे याचा फटका बाजारातील पुरवठ्यावर तसेच उद्योगातून बाहेर पडणाऱ्या उत्पादनावर पडणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांना परत आणण्यासाठी विशिष्ट धोरण आखावे, असा सल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

पवारांचा हा सल्ला मात्र काहीसा भूमिपुत्रांना मागे सारणारा आहे. कारण मजुरांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्याने आता भूमिपुत्रांना त्यांच्या जागी रोजगार मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. मात्र असे असतानाचं मजुरांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने काही उपाययोजना कराव्यात असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या या विधानाने राज्य सरकार देखील काही प्रमाणात अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली होती. तर त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही तरी व्यवस्था करावी अशीही मागणी केली होती. मात्र आता पवारांनीच परप्रांतीय मजुरांना परत आणण्याचे विधान केले आहे. त्यामुळे परत आणायचे होते तर मग धाडलेचं कशाला असा प्रश्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार समोर देखील पडणार आहे.

तसेच दुसरीकडे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आता भूमिपुत्रांना सुवर्ण संधी चालून आली असल्याचं सांगत आहेत. तर येत्या काळात राज्यात भूमिपुत्रांना मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे, असे देसाई सांगत आहेत. कामगार नसल्याने उद्योगांची उत्पादन काढण्याची गती काहीशी मंदावली आहे. त्यामुळे स्थलांतरीत कामगार नसतील तर आपल्या भूमिपुत्रांना नेमा, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना केले आहे. शिवसेनेने पहिल्यापासूनचं भूमिपुत्रांची बाजू आक्रमकतेने मांडली आहे. मात्र आता पवारांचा मजुरांना परत आणण्याचा सल्ला शिवसेना ऐकणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तसेच देसाई यांनी भूमिपुत्रांसाठी इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट ब्युरो देखील स्थापित करणार असल्याची माहिती दिली. लेबर ब्युरोच्या माध्यमातून कुशल, अकुशल मजुरांची नोंद ठेवली जाईल. या मजुरांना कंपन्यांकडे पाठवण्यात येईल. त्यातून त्यांनी मजूर निवडावेत, असं देसाई म्हणाले. कामगार, उद्योग आणि कौशल्य विकास विभाग मिळून यावर काम करत असून त्यामुळे कामगारांची टंचाई दूर होईल, असे देसाई म्हणाले आहेत.

देसाईंनंतर सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी देखील भूमिपुत्रांनो मिळालेल्या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन केले आहे. स्थानिक तरुणांनी आता परप्रांतीय माजुरांची कमी भरून काढावी व आपल्या शैक्षाणिक पात्रतेनुसार योग्य नोकरी मिळवावी, असे भोसले म्हणाले आहेत. रोजगार उपलब्ध नाही, नोकरी मिळत नाही, परप्रांतीयांमुळे औद्योगिक वसाहतींमध्ये स्थानिकांना नोकरी नाही, त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईवरून अवलंबून राहावे लागते, असे आपण नेहमीच ऐकत असतो, पण आजमितीला वेगळी स्थिती आहे. आता सुवर्णसंधी आली आहे. हजारो परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतले आहेत. त्यामुळेएमआयडीसीतील विविध कंपन्यांमध्ये टर्नर, फिटर, हेल्पर, मशिन ऑपरेटर, गवंडी, सुतार अशा अनेक पदांच्या असंख्य जागा रिक्त आहेत. विविध वाहतूक संस्थांमध्ये वाहनचालकांची असंख्य पदे रिकामी आहेत. करोनासारखी महाभयंकर साथ ही वाईट आहेच, पण यामुळे का होईना रोजगाराची मोठी संधी निर्माण झाली आहे. ही चालून आलेल्या संधीचा स्थानिक भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भोसले यांनीही केले.