एकीकडे महाविकास आघाडीने एकत्र लढण्यावर पवारांचा भर, तर पटोलेंचा स्वबळाचा नारा कायम !

nana patole vs sharad pawar

बुलढाणा : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर राज्यात कधीही अपेक्षित नसणारी राजकीय आघाडी झाली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवणी करून महाविकास आघाडीची स्थापना केली. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे सर्वाधिक जागा जिंकून देखील भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. दरम्यान, हे सरकार फार काळ टिकणार नाही, आपल्या ओझ्यानेच कोसळेल असं भाकीत भाजप नेत्यांनी केलं.

मात्र, या सरकारने दीड वर्ष पूर्ण केलं असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा विश्वास आघाडीतील नेते व्यक्त करत आहेत. तर, आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था/महापालिकांच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिला असून तशी तयारी देखील सुरु केली आहे. तर, काँग्रेसने पुढील विधानसभा स्वबळावर लढून सत्ता मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशातच, या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस अनेकदा समोर आले आहेत. सरकारच्या कारभारावर देखील आघाडीतील काही नेते नाराज आहेत.

अशातच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. ते राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.’हे सरकार टीकेल आणि पाच वर्ष काम करेल. नुसतंच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभेत एकत्रित काम करुन सामान्य जनतेचं देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही,’ असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची नारा कायम ठेवला आहे. ते सध्या बुलढाणा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेल नाही. आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. नंतर प्रस्ताव आल्यावर ठरवू.’ यामुळे महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या