हयात नसताना टीका न करायला सांगणाऱ्या पवारांनी साधला होता स्व.बाळासाहेब विखेंवर निशाणा

टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर मोदींवर सर्वच थरातून टीकेची झोड उठली होती. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उडी घेत हयात नसताना राजीव गांधींवर टीका करणे चांगलं नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मात्र, शरद पवार यांनी हा सल्ला देण्याआधी म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या अगदी तोंडावर कॉंग्रेसचे दिवंगत नेते बाळासाहेब विखे यांवर जोरदार निशाणा साधला होता. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यावरून सुरु असलेल्या वादावरून शरद पवार यांनी १९९१ साली झालेल्या लढाईची आठवण करून देत दिवंगत बाळासाहेब विखेंवर टीका केली होती.

पवार म्हणाले होते, “या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील. यात निवडून येण्याचा वाद नाही. याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केला होता. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी माझ्यावर केसही केलेली होती. त्यामध्ये माझा कॉन्स्टिट्यूशनल राईट्ससुद्धा रद्द केला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळे ही सीट आम्ही जिंकू शकतो. ती जागा काँग्रेसकडे असतानाही विजय झाला नाही हा सुद्धा इतिहास आहे.”यावरून नंतर मोठ वादंग देखील झालं.

दरम्यान, त्यानंतर विखे-पाटील कुटुंबीय आणि बाळासाहेब विखे-पाटील यांच्याबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत राधाकृष्ण तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने हयात नसलेल्या व्यक्तीबाबत वक्तव्य करणे दुर्दैवी आहे. शरद पवार यांच्या मनाता बाळासाहेब विखे पाटील यांच्याबद्दल अद्यापही द्वेष कायम आहे, असे राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले होते.

माजी पंतप्रधान राजीव गांधी मिस्टर क्लीन असं बिरूद मिरवत, मात्र तुमच्या वडिलांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वनच्या रूपात झाला होता, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यावर आता शरद पवार यांनी हयात नसलेल्या व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला आहे. त्यामुळे स्व.बाळासाहेब विखेंवर निशाणा साधताना ते हयात नाहीत याची कल्पना शरद पवारांना नव्हती का ? असा उद्विग्न सवाल विखे यांचे कार्यकर्ते करत आहेत. तर हा सल्ला देण्यापूर्वी शरद पवारांनी स्वतः एकदा आत्मपरीक्षण करावं अस देखील बोललं जात आहे.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU