‘पवारांनी माघार घेतली अन्यथा त्यांना रणजितदादांकडून पराभवाला सामोरे जावे लागले असते’

टीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असा विजय माढा लोकसभा मतदार संघातील मतदार आणि कार्यकर्त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून दिला आहे. शरद पवार यांना आपली ही जागा राखता आली नाही, ही मोठी नामुष्की असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडले आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील विजयानंतर खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे क्रांतीसिंह नाना पाटील चौक, फलटण येथे उत्साही स्वागत आणि मिरवणूक काढण्यात आली यानंतर झालेल्या विजयी सभेत बोलताना पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारा, देशाच्या सीमा सुरक्षित असल्या पाहिजेत यासाठी यशस्वी प्रयत्न केलेला हाच पंतप्रधान पुन्हा पाहिजे हा सर्वसामान्य मतदारांनी निर्धार केल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच शरद पवार यांनी या निवडणुकीतून माघार घेतली अन्यथा त्यांना रणजितदादांकडून पराभवाला सामोरे जावे लागले असते, तरीही त्यांना आपला मतदार संघ राखता आला नाही ही खंत असल्याचे  चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.