fbpx

पार्थ मावळ लढवण्यास तयार, मात्र शरद पवारांनी घातला खोडा

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत हा इतिहास आहे. आता पवार लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त शरद पवार निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नसल्याचं पवार यांनीच जाहीर केलं आहे.

तर दुसरीकडे पार्थ पवार म्हणत आहेत की, पक्षाने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची संधी दिली तर मी मावळमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे.

राज्यातील राजकारणापेक्षा मला केंद्रातील राजकारणात जास्त रस आहे. केंद्रात गेल्यावर माझ्यासाठी हा राष्ट्रीय मुद्द्यांवर काम करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध असेल. २८ वर्षीय पार्थ यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याबाबत आपली भुमिका हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केली.

शरद पवार यांचा नातू यांचा पुतण्या रोहित पवार तसेच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे दोघेही गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय झालेले पाहायला मिळत आहेत. याच मुद्द्यावरून पवार घराणेशाहीवर सोशल मिडीयात मोठ्याप्रमाणावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे काल पार्थ पवार यांनी आपल्याला राष्ट्रीय राजकारणात रस असून पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं. जर पक्षानं यंदाच्या निवडणुकीसाठी इतर दुसऱ्या कार्यकर्त्याला मावळमधून उमेदवारी दिल्यास २०२४ च्या निवडणुकीपर्यंत थांबण्याची माझी तयारी आहे. त्यावेळी वयही माझ्या बाजूने असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

‘सध्या आपण कार्यकर्ता म्हणून काम करत असून पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार आमदार निवडून आणायचे आहेत. तसंच वरिष्ठांनी आदेश दिल्यास निवडणूक देखील लढवण्यास तयार असल्याचं’, सूचक विधान अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी केलं होतं. पण त्यांनाही लोकसभा निवडणुक न लढवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.

असं असलं तरीही पवारांच्या शब्दावर किती विश्वास ठेवावा हा प्रश्न कायम आहे. कारण यापूर्वी दस्तुरखुद्द पवारांनी यापुढे लोकसभा निवडणूक लढविणार नाही अशी सिंहगर्जना केली होती,मात्र आगामी काळात पंतप्रधान होण्याची शक्यता दिसत असल्याने पवार पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत अशी चर्चा आहे .