पवारांची पलटी,म्हणाले माढ्यातून निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नव्हता

टीम महाराष्ट्र देशा- पलटी मारण्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आणखी एक पलटी मारली आहे.लोकसभेची निवडणूक माढा लोकसभा मतदार संघातून लढविणार असल्याची घोषणा करून माघार घेतल्यानंतर आता आपण माढ्यातून निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नव्हता असं म्हटलं आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवार यांनी हा अजब दावा केला आहे. माढ्याची जागा सुरुवातीपासून आमच्याकडे आहे. ही जागा आणण्यासाठी अधिक काळजी घ्यावी म्हणून मी केवळ तिथून निवडणूक लढवणार असे सिग्नल देत होतो. मात्र मी तिथून लढणार नव्हतो. तसा माझा विचार नव्हता असं पवार म्हणाले.

आम्हाला विजयसिंह मोहितेंना तिथून लढवायचं होतं. मात्र त्या मतदारसंघात बाकीच्या 5 विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या नावाला विरोध होता. मात्र इथला उमेदवार हा त्यांच्या सहकार्याने दिला असता, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी नवीन दमाच्या उमेदवारांना संधी देण्यासाठी मी माघार घेत आहे असे स्पष्टीकरण पवार यांनी दिले होते.पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेवून पवार यांनी याबाबतची माहिती दिली. कुटुंबातील सर्वच उमेदवार नकोत असा कुटुंबात विचार झाला. त्यामुळे नवीन दमाच्या उमेदवाराला संधी देवून मी थांबणार आहे असं पवारांनी सांगितले होते. मग जर हे असे असेल तर माढ्यातून निवडणूक लढविण्याचा कोणताही विचार नव्हता हे म्हणणे म्हणजे पलटी मारणे नव्हे का असा सवाल उपस्थित झाला आहे.