मविआ मंत्र्यांचा केंद्र सरकारविरोधात टाहो; मात्र पवार म्हणाले, केंद्र राज्याला सहकार्य करतंय

sharad pawar

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फोफावत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जनजीवन सुरळीत झाले होते. मात्र, नियमांचे पालन न झाल्याने राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे. राज्यात लॉकडाऊन सारखे कडक निर्बंध देखील लावले जात आहे.

दरम्यान, राज्यातील कडक निर्बंधांना विविध जिल्यातील व्यापाऱ्यांसह सामान्यांनी देखील विरोध केला आहे. तसेच, राज्यात लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात सुरु असून लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना केंद्रावरून पुन्हा माघारी फिरावं लागत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारने अतिरिक्त साठा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसींची सर्वाधिक गरज महाराष्ट्राला असताना सापत्न वागणूक केंद्र सरकार देतंय अशी टीका केली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी फेसबूक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे. या संवादावेळी केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करत आहे, असं प्रतिपादन शरद पवार यांनी केलं आहे.

‘राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहेत. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे आश्वासन दिले असून महाराष्ट्राचे प्रयत्न व केंद्राच्या मदतीने आपण या संकटातून बाहेर पडू,’ असा विश्वास देखील पवारांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :