‘पवार साहेब, तुमचा कोर्टावर भरोसा नाय का?’, फडणवीसांचा खोचक सवाल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर कथित शंभर कोटी रूपयांच्या वसूली प्रकरणी सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे. तपासादरम्यान सीबीआयने पाच वेळा देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर येथील निवासस्थानांवर छापा टाकला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार मुंबई आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान यांनी भाजपवर टीका केली होती.

‘काही संस्थांचा गैरवापर करण्याची पावलं सातत्यानं केंद्र सरकारकडून टाकण्यात येत आहे. सीबीआय, इन्कम टॅक्स, एनसीबी यांसारख्या संस्थांचा वापर राजकीय दृष्टीनं केला जात असल्याचं सध्या चित्र दिसत आहे असा आरोप शरद पवार यांनी केला होता. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘देशमुख यांच्यावरील कारवाई न्यायालयाच्या आदेशानूसार सुरू आहे. पवारांचा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टावर विश्वास आहे की नाही?’ असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

फडणवीस म्हणाले, ‘उच्च न्यायालयाच्या आदेशानेच अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली. हायकोर्टाने यासंदर्भात सीबीआय चौकशीचा निर्णय दिला आहे. खरे तर राज्यात सरकार आल्यानंतर सीबीआयनं आमच्या राज्यात चौकशीच करु नये, असे सांगितल्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राचे किंवा देशाचे पैसे बुडवले अशा ८० बँक घोटाळ्याचे सीबीआयला मान्यता न दिल्यामुळं धुळखात पडली आहेत.

पण देशमुख प्रकरणात स्वतः हायकोर्टानं या ठिकाणी निर्णय दिला आणि सीबीआयला चौकशीचे निर्देश दिले. त्यामुळे आमचा प्रश्न आहे की पवारांना हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे की नाही? कोर्टाने दिलेले आदेश पाळायचे की नाही? ज्या प्रकारे या संस्थांना राज्यात वागवलं जात आहे. ते देखील कुठेतरी आक्षेपार्ह आहे, असेही माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या