‘पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री झाले पण कधीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाहीत’

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पहायला मिळत आहे. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध करत पवारांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यावेळी भाजपवर शरसंधान साधलं. त्यांच्या या बंदला विरोध करत फडणवीसांनी त्यांना मावळ गोळीबाराची आठवण करुन दिली.

मावळ गोळीबार मुद्द्यावरुन महाविकास आघाडीवर भाजप अनेक टीका टीपण्णी करत होते. शरद पवारांनी याबाबत मावळ कथा सांगत मावळ प्रकरणात गैरसमज झाल्याचं स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरद पवारांनी फडणवीसांना चांगलंच धारेवर धरलं आहे. फडणवीस एका कार्यक्रमामध्ये म्हणाले मला अजुनही मी मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं. यावर पवारांनी त्यांची खिल्ली उडवली.

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानाची पवारांनी खिल्ली उडवली होती. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिलं. पवार मोठे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. पण कधीच ते पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले नाही. राहिले असते तर त्यांनी चांगलं काम केलं असतं. कधी दोन वर्ष, कधी तीन वर्ष त्यांनी काम केलं. त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना राहता आलं नाही. पण मी विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी आहे. त्यामुळेच सत्ताधारी अस्वस्थ आहेत, असंही ते म्हणाले.

कालच्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी अजूनही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. चांगली गोष्ट आहे त्यांना अजूनही सत्तेत असल्यासारखे वाटते. मी ही चार वेळा मुख्यमंत्री होतो. पण माझा अनुभव वेगळा आहे. मुख्यमंत्री पदावर काम केल्यानंतर पुढच्यावेळी मी विरोधी पक्षात काम केले आहे. त्यावेळी प्रशासनाने सत्तेवर असताना आपल्याला दिलेले अहवाल आणि जमिनीवरची वास्तवता वेगळी असते. विरोधात असताना लोकांमध्ये फिरल्यानंतर त्याचा अभ्यास होतो, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या