सततच्या पराभवामुळे शरद पवारांना नैराश्याने ग्रासले – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : सतत होत असलेल्या पराभवामुळे शरद पवारांना नैराश्य आले आहे. आणि त्यातूनच त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना आलेल्या धमकीच्या पत्राबाबत शंका व्यक्त केली. अशी टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ते कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या विधानाचा समाचार घेतला. पंतप्रधान हे देशाचे आहेत त्यांच्यावर जाहीर टिप्पणी करणे योग्य नाही. गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतत पराभव होत आहेत, त्यामुळेच शरद पवारांना नैराश्य आले असून, ते अशा पद्धतीचे विधान करत असल्याचं पाटलांनी म्हंटलं.

दरम्यान छगन भुजबळ यांच्याबद्दल बोलताना पाटील म्हणाले की, ते निर्दोष आहेत हे सिद्ध व्हायचं आहे, त्यावेळी भुजबळ यांच्यावर आरोप झाले म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले की, राजू शेट्टींनी आपल्या मतदारसंघाची काळजी करत निवडून कसे येणार हे बघावं, कारण शिरोळ तालुक्यात भाजप आघाडीवर आहे.