fbpx

ऊस शेतकरी आणि साखर धंद्याला मदत करण्यासाठीच माझे राजकारण – पवार

माढा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे लक्ष केवळ साखर उद्योगाकडे आहे, अशी टीका दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकलूज येथे केली होती. आज मोदी यांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी माझे राजकारण ऊस शेतकरी आणि साखर धंद्याला मदत करण्यासाठीच असल्याचं सांगितले आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी नातेपुते येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सभा घेत भाषण करतात, राज्यामध्ये भयानक दुष्काळ असल्याने ते त्यावर बोलतील ही अपेक्षा होती. पण मोदींनी दुष्काळावर एक शब्दही काढला नाही. पवारांच्या घरात कलह सुरु आहेत असे मोदी सभांमध्ये सांगतात. आता आम्ही घरात जीवाभावाने राहतो, पण मोदी एकटे असल्याने त्यांना घर कसं चालत हेच माहिती नाही, असा घणाघात पवारांनी केला आहे.

ऊस शेती आपल्या भागामध्ये प्रमुख उत्त्पन्नाचे साधन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसावर प्रक्रिया करून त्यांना जास्त पैसा देण्याचं काम आम्ही केलं आहे. मोदी माझे लक्ष साखर उद्योगाकडे जास्त असल्याचं सांगतात, पण ऊस शेतकरी आणि साखर धंद्याला मदत करण्यासाठीच माझे राजकारण असल्याचं पवार म्हणाले.