fbpx

गडचिरोली हल्ल्यावरून राजकारणाला सुरुवात; पवारांनी केली मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

sharad pawar and devendra fadnvis

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

दरम्यान,आता याच मुद्द्यावरून राजकारण व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भ्याड हल्ला घडवून आणला. यात १५ जवान आणि एक चालक शहीद झाले. या संपूर्ण प्रकारावर गृहखात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध व मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही असं देखील पवार यांनी म्हटले आहे. गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘जनाची नाही तरी मनाची’ लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर पवारांनी तोफ डागली आहे.