fbpx

भारतासाठी अभिमानाची बाब, ऑलिम्पिक २०२० साठी नेमबाजी पंच म्हणून पवन सिंहांची निवड

पुणे : नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे मानद सहमहासचिव पवन सिंह हे ऑलिम्पिक नेमबाजी स्पर्धांमधील पहिले भारतीय पंच ठरणार आहे. सिंह यांची टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२० साठी नेमबाजी पंच म्हणून निवड झाली आहे.

द इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशन (आयएसएसएफ)ने पवन सिंह यांची चौथा आरटीएस (निकाल, वेळ, गुण) पंच सदस्य म्हणून टोकियोच्या ऑलिम्पिक २०२०च्या खेळांसाठी अधिकृतरीत्या निवड केली आहे. यजमान देश जपान व्यतिरिक्त नेमबाजीमध्ये रायफल, पिस्टल, डिसिप्लीनला असलेल्या पंचांमध्ये आशियाई देशातून पवन सिंह एकमेव आहेत. त्यामुळे ते ऑलिम्पिक खेळातील नेमबाजीचे अधिकृत पहिले भारतीय पंच ठरले आहेत.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले, “हे जणू माझे स्वप्नच सत्यात उतरले आहे. मागील काळात मी जी काही कामगिरी करू शकलो आहे त्याची परिणीती म्हणजे ही निवड आहे असे मला वाटते. परंतु एनआरएआय अध्यक्ष रवींद्र सिंह यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनाशिवाय हे शक्य झाले नसते.” सिंह हे आयएफएफएस जजेस कमिटी’चे सदस्य व गन फॉर ग्लोरी शूटिंग अकादमीचे सहसंस्थापक देखील आहेत. “ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळावे असे मला नेहमीच वाटायचे. ज्यावेळी मी स्वतः नेमबाज म्हणून सहभागी होत असे त्यावेळी हे शक्य नव्हते आणि मी प्रशिक्षक किंवा प्रशासक होऊ शकलो नाही. पण, आज मला खूप आनंद आहे की मी अधिकृतरीत्या माझे स्वप्न सत्यात उतरताना बघू शकत आहे,” अशाही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

या महिन्याच्या सुरुवातीला चीन येथे ‘आयएसएसएफ बी पंच परवाना अभ्यासक्रम’ आयोजित करण्यात येणार आहे. असा अभ्यासक्रम करणारे पवन सिंह हे पहिले भारतीय असणार आहेत. तसेच बीजिंग येथे पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठीही त्यांची निवड झाली आहे.

जगभरातून सहभागी झालेल्या २२ सदस्यांमधून केवळ सात सदस्यांची आयएसएसएफ पंच समितीवर निवड झाली. त्यात पवन सिंह यांची निवड झाली आहे. म्युनिक येथे आयएसएसएफच्या प्रशासक परिषदेच्या सदस्यांनी मतदान करून या सात पंचांची निवड केली आहे.