‘राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करणारे पटोलेंनी आता आपला शब्द पाळावा’

blank

टीम महाराष्ट्र देशा-  १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळून देशात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच सरकार सत्तेवर आले आहे. महाराष्ट्रात अनेक लढती लक्षणीय ठरल्या मात्र बहुचर्चित पटोले-गडकरी लढतीने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले होते. पटोले यांनी गडकरी यांच्यावर अनेक आरोप केले तसेच अनेक आव्हाने देखील केली होती. ५ लाख मतांनी निवडून येण्याचा दावा करताना त्यांनी पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली होती आता हीच घोषणा पटोले यांच्या गळ्यातील हड्डी बनण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

निवडणुकीतील विजयानंतर माध्यमांशी बोलताना गडकरी यांनी पहिल्यांदाच पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले. प्रचारादरम्यान आपण पातळी न सोडता कुणावरही व्यक्तिगत टीका केली नाही. मात्र, पटोले यांनी पातळी सोडून उद्धट भाषा वापली. ५ लाख मतांनी निवडून येण्याचा दावा करताना त्यांनी पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेण्याची घोषणा केली. या पराभवाने त्यांचा अहंकार आणि उन्माद उतरला असेल. आता त्यांनी आपला शब्द पूर्ण करावा अन्यथा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार त्यांना संन्यास घेण्यात भाग पाडतील, असा इशारा गडकरी यांनी दिला.