रक्ताचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांना आता मुंबईला जाण्याची गरज नाही

patients-with-leukemia-do-not-need-to-go-to-mumbai

औरंगाबाद – घाटी रुग्णालयात आलेल्या रुग्णांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी रुग्णांची चाचणी खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये करावी लागत होती मात्र आता ही चाचणी घाटीतच कमीत कमी पैशात केली जाणार आहेे. त्यासाठी लागणारे ऐंशी लाख रुपयांचे फ्लो सायटोमीटर या यंत्राचे वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे यांच्या हस्ते काल रविवारी लोकार्पण करण्यात आले.

घाटी येथील महात्मा गांधी सभागृहात ‘रक्त कर्करोगांच्या तपासण्या’ या विषयावर रविवारी एकदिवसीय कार्यशाळा झाली. त्यानंतर या यंत्राचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे-कागिनाळकर, उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, विभागप्रमुख डॉ. राजन बिंदू, अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, डॉ. ए. आर. जोशी, डॉ. मंजूषा शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी डॉ. बारपांडे म्हणाले, ‘‘विविध उपकरणे आणि यंत्रसामग्री उपचारांना दिशा देण्यात मोलाचे काम करते; मात्र डॉक्टरांनी यंत्रांवर तपासण्या करताना आपले निदान केवळ यंत्रांवर अवलंबून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. अनुभव आणि ज्ञानाचा पुरेपूर वापर करावा. शासकीय सेवेत दाखल दर्जेदार यंत्रसामग्रीचा रुग्णसेवेसाठी चांगला उपयोग करावा,’’ असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंजूषा ढवळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शुभज्योती पोरे यांनी आभार मानले. कार्यशाळेत डॉ. सुनीता पाटील, डॉ. प्रगती फुलगीरकर, डॉ. अंजली कुलकर्णी यांचा सहभाग होता.

आता मुंबईला जाण्याची गरज नाही
घाटीत दर आठवड्याला 10 ते 12 रुग्णांना ब्लड कॅन्सर ची तपासणी करावी लागत होती त्यामुळे या रुग्णांना तपासणी करण्यासाठी मुंबईला पाठवले जात होते, या यंत्राच्या साहाय्याने आता रुग्णांची तपासणी इथेच होणार असल्याने रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज पडणार नाही.रक्ताच्या कॅन्सर चे निदान करणारे हे मशीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या यंत्रणेत उपलब्ध करण्यात आले आहे . मराठवाड्यातील हे पहिलेच यंत्र आहे