डॉ. पतंगराव कदम अनंतात विलीन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

dr kadam1

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजून ५० मिनिटांनी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. आज सांगलीतील वांगी गावात पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पतंगराव यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिली.

पतंगराव कदम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह विविध पक्षाचे मोठे नेते उपस्थित होते. पतंगराव यांना मानणारा मोठा वर्ग आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी मोठी गर्दी केली. अंत्यसंस्काराला उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार केले जात होते. पतंगराव कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात अनेक मंत्रिपदाची धुरा सक्षमपणे संभाळलेली होती.

patangrao kadam

महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा विजयी झालेल्या डॉ. कदम यांनी राज्य मंत्रिमंडळात वने,मदत भूकंप पुनर्वसन मंत्रीपदांची धुरा संभाळलेली होती. त्यांनी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी भारती विद्यापीठाची स्थापना केली. आज भारतासह जगभरातील अनेक शहरांत भारती विद्यापीठाची महाविद्यालयांचे जाळे पसरले आहे. अत्यंत शांत मितभाषी आणि अभ्यासू म्हणून डॉ. कदम हे ओळखले जायचे. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे.