आरपीआयमध्ये गटबाजी करणारांवर पक्ष नेतृत्व कारवाई करेल – डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शहराध्यक्षपदी लोकशाही पद्धतीने निवडुन आलेले माजी नगरसेवक अशोक कांबळे हेच पुण्याचे अधिकृत शहराध्यक्ष असतील, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. त्यामुळे नाराज गटाला बरोबर घेऊन काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. माध्यमांतून गटबाजीच्या बातम्या पेरणारांना पक्षाच्या वरिष्ठांनी समाज द्यावी व पक्ष वाढीसाठी काम करण्याच्या सूचना कराव्यात अशी विनंती केली आहे. समज देऊनही ऐकत नसतील, तर पक्षाकडून कारवाई करण्याबाबतच्या सूचना ज्येष्ठ नेत्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्वार्थासाठी गटबाजी करणाऱ्यांवर पक्ष नेतृत्व कारवाई करेल, असे रिपब्लिकन नेते आणि उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सांगितले.

डॉ. धेंडे आणि रिपब्लिकन पक्षाचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी पक्षाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, युवक आघाडीचे नीलेश आल्हाट, माजी नगरसेवक आयुब शेख, संतोष लांडगे, माहिपाल वाघमारे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड आदी उपस्थित होते.

डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आरपीआयमध्ये फूट पडल्याचे चित्र निर्माण केले आहे. मात्र, ही प्रक्रिया लोकशाही पद्धतीने झाली आहे. त्यावर आक्षेप घेणे म्हणजे डॉ. बाबाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी प्रतारणा करणे आहे. त्यामुळे नाराज गटाने आपला हट्ट सोडून पक्षाच्या हितासाठी एकत्र यावे. आरोग्य, शिक्षण, नागरी समस्या असे अनेक विषय आपल्यासमोर आहेत. त्यामुळे त्यावर काम करण्यासाठी आपण एकत्रित आले पाहिजे. मातंग समाजाच्या मोर्चाला पाठिंबा देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू.

अशोक कांबळे म्हणाले,  लोकशाही प्रक्रियेतून माझा विजय झाला आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी मला सहकार्य करावे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका आहे. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड

आघाडीच निमंत्रण आल्यावर बघू; महाआघाडीसाठी राज ठाकरेंच ‘वेट अँड वॉच’