राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल – विखे पाटील

vikhe patil and rahul gandhi

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी खा. राहुल गांधी यांची निवड झाल्यामुळे देशभरातील लाखो कार्यकर्त्यांच्या आकांक्षा पूर्ण झाल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

खा. राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर शुभेच्छा व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, खा. राहुल गांधी एक खंबीर नेते आहेत. मागील अनेक वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मजबुती देण्यासाठी ते देशभर फिरत आहेत.

शेतकरी, शेतमजूर, कामगार, महिला, युवक, दलित, आदिवासी, अल्पसंख्यक आदी समाजघटकांबाबत ते कमालीचे संवेदनशील असून, याच घटकांना केंद्रीभूत ठेवून ते काम करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील उपेक्षीत, मागास व वंचित घटकांचा आवाज अधिक बुलंद होईल.

सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात सामाजिक न्यायाच्या अनेक योजनांची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या माध्यमातून समाजाच्या तळागाळात असलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणता आले. खा. राहुल गांधी यांच्या कार्यकाळात हेच कार्य अधिक गतीने पुढे जाईल. काँग्रेस अध्यक्ष म्हणून खा. राहुल गांधी यांची निवड झाल्याने देशातील तरूणाईमध्ये उत्साह संचारला असून, कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळाल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.