fbpx

पराभवानंतर संपर्क क्षेत्रात नसणारे पार्थ पवार इफ्तार पार्टीत दिसले

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मावळचे उमेदवार पार्थ पवार हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले होते. निवडणुकीच्या निकालानंतर पार्थ पवार यांनी कोणत्याही माध्यमांशी संवाद देखील साधला नव्हता. त्यामुळे पार्थ पवार नेमके आहेत तरी कुठे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर पार्थ पवार यांनी एका इफ्तार पार्टीमध्ये उपस्थिती लावून आपले दर्शन दिले आहे.

रमजानच्या महिन्यानिमित्त देहूरोड येथे इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या इफ्तार पार्टीला पार्थ पवार हे आवर्जून उपस्थित राहिले. पार्थ यांनी या इफ्तार पार्टीत लहान मुलांना आपल्या हाताने घास भरवत रोजा सोडवला.तर आपल्या मुस्लीम बांधवांमध्ये मिळून मिसळून पार्थ यांनी पार्टीचा आनंद घेतला.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला. त्यामुळे हा निकाल अनेकांसाठी अविश्वसनीय होता. मात्र अजित पवार यांनी जनतेच्या निर्णयाचे स्वागत केले व पुत्र पार्थ पवार यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली. या साऱ्या निवडणुकीच्या गोंधळानंतर पार्थ पवार हे दिसेनासे झाले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले होते.