पार्थच्या विजयासाठी जय झाला सज्ज, अजित दादांचा दुसरा मुलगा देखील रिंगणात 

टीम महाराष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पार्थ यांची ही पहिलीच निवडणूक असल्याने राष्ट्रवादी पक्षा कडून चांगलीच मोर्चे बांधणी सुरु असून संपूर्ण पवार परिवार पार्थच्या प्रचारात सक्रीय होताना दिसत आहे. तर आता पार्थला त्याचा धाकटा भाऊ सोशल मिडीयाच्या माध्यमातून मदत करणार आहे.
पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे या बड्या नेत्याला टक्कर दयायची आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी पक्षश्रेष्ठी शरद पवार, वडील अजित पवार, चुलत भाऊ रोहित पवार, आणि असंख्य कार्यकर्ते मदत करताना दिसत आहेत. तर पार्थ पवार यांचा धाकटा भाऊ जय अजित पवार सोशल मिडीयाच्या सहायाने तरुण मतदार आकर्षित करून घेणार आहे. या निवडणुकीच्या हंगामात जय पवार हे पार्थ पवार यांचे सोशल मिडिया सांभाळणार आहेत.
सोशल मिडीया हे आता प्रचार आणि प्रसाराचे  उत्तम साधन असल्याने अनेक राजकीय पक्ष आणि नेते आपल्याला सोशल मिडीयावर झळकताना दिसत आहेत. तसेच बहुतांशी तरुण वर्ग हा सोशल मिडीयाच्या सानिध्यात असल्याने या माध्यमातून राजकीय हित चांगलेच साधता येते. आणि याचा अनुभव आपल्याला मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाने दिसून आला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या सोशल मिडियाची जबाबदारी जय पवार ने घेतली असून, तो आता भावाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार आहे.