रिक्षा, बैलगाडीनंतर आता पार्थ पवारांचा घोड्यावरून प्रचार, पद्मसिंह मामांच्या स्टाईलची झलक

चिंचवड: मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रावादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत, पार्थ यांची पहिल्याच जाहीर भाषणात उडालेली भंबेरी सोशल मिडीयावर चर्चा विषय बनली होती. रिक्षा, लोकल ट्रेन, बैलगाडीनंतर आता घोड्यावर बसून प्रचार करण्याचीही हौस पार्थ यांनी फेडून घेतली आहे. गुरुवारी चिंचवड बाजार पेठेत त्यांनी घोड्यावरबसून प्रचार केला आहे.

पार्थ पवार यांनी मावळातून विजय मिळवण्यासाठी सर्व शक्तीपणाला लावली आहे, वडील अजित पवार, भाऊ जय पवार, आई सुनेत्रा पवार या देखील मुलासाठी मेहनत घेत आहेत. यामध्ये पार्थ पवार सामान्य नागरिकांमध्ये जाण्यासाठी रिक्षा, लोकल ट्रेन, बैलगाडीने प्रचार करण्याचा मार्ग अवलंबत आहेत. त्यानंतर आता पार्थने गुरुवारी घोड्यावरून केलेला प्रचार मामा पद्मसिंह पाटील यांची आठवण करून देणारा आहे.

उस्मानाबादचे राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि सुनेत्रा पवार यांचे भाऊ पद्मसिंह पाटील यांनी देखील अनेकवेळा घोड्यावरून प्रचार केला आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील नागरीकांत पाटील यांच्या स्टाईलची कायम असते. आता पार्थने आपल्या मामाच्या स्टाईलची कॉपी केली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील बाजार पेठेत प्रचारासाठी आलेले पार्थ पवार चक्क फेटा घालून घोड्यावर स्वार झाले आणि चिंचवड बाजारपेठेचा फेरफटका मारला. वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करणाऱ्या पार्थ यांच्या घोडेस्वारीची चर्चा चिंचवड मध्ये होती.