पार्थ पवारांची गोष्टच न्यारी; साडेसोळा कोटींची प्रॉपर्टी, सुप्रिया आत्या – शरद आजोबांना लाखोंचा ‘अ‍ॅडव्हान्स’

पुणे: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, मंगळवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिलीय. यामध्ये पार्थ यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी पुण्यातल्या उच्चभ्रू वस्तीत पाच कोटी रुपयांचा बंगला खरेदी केल्याचं सांगण्यात आलं आहे.

पार्थ पवार यांनी ए, आर, कॉलेज ऑफ कॉमर्स अॅड इकोनॉमिक, मुंबई येथून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या मुख्य व्यवसाय शेती आणि इतर बिझनेस आहे. आता हा बिझनेस कोणता हे प्रतिज्ञापत्रात सांगितलेले नाही. पार्थ यांनी स्वतः कमावलेली संपत्ती १३ कोटी ६१ लाख ४९ हजारांची आहे. तर सुमारे २ कोटी ८१ लाख ३५ हजारांची संपत्ती त्यांना वासराहक्काने मिळाली आहे.

विशेष म्हणजे पार्थ यांनी राजकारणातील चाणक्य असणारे आजोबा शरद पवार यांना ५० लाख, आत्या सुप्रिया सुळे यांना २० लाख रुपये शेअर ट्रान्सफरसाठी ‘अ‍ॅडव्हान्स’ म्हणून दिले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करताना सुप्रिया सुळे यांनी पार्थ यांच्याकडून २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याच नमूद केलं होत.

पार्थ अजित पवार यांनी आपल्या आई सुनेत्रा पवार यांच्याकडून ७ कोटी १३ लाख, भाऊ जयकडून २ कोटी २३ लाख रुपये कर्ज घेतल्याचं सांगितले आहे.