‘मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले हा त्याचाच एक भाग’

sawnat

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात येताच अदानी यांनी कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. मुंबईचे हे विमानतळ आता पूर्णपणे ‘अदानी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेड’च्या ताब्यात गेले आहे. त्याबरोबर एएएचएलचे मुख्यालय मुंबईतून हलविण्यात आले आहे.

अदानी समूहाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मुंबई विमानतळावरील जीव्हीके समूहाचा हिस्सा संपादन करण्याची घोषणा केली होती. सध्या बांधकाम सुरु असलेल्या नवी मुंबईच्या विमानतळाचा ताबाही अदानी यांच्या कंपनीकडे गेला आहे. अदानींच्या या निर्णयामुळे एक मोठी कंपनी आता पुन्हा मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट झाली आहे.

अदानींनी घेतलेल्या या निर्णयाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यावरून आता महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी चांगलेच रान उठवले असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेले दांडीया नृत्य बरंच काही सांगून जाते. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी गेल्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे. जागतिक वित्तीय केंद्रही असेच गुजरातला नेले गेले,’ असे सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

तसेच, ‘महाराष्ट्राने कोणत्याही उद्योगांना वा उद्योजकांना आपपरभाव दाखवला नाही. अनेक उद्योजक महाराष्ट्रात आले व महाराष्ट्राचे झाले. मुंबई विमानतळ आधी GVK या आंध्रप्रदेशच्या कंपनीकडे होते. GVK ने मुंबई विमानतळाचे मुख्यालय आंध्रप्रदेशला नेले नाही किंवा विमानतळावर कुचीपुडी नृत्य करवले नाही,’ असेही सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यालय अहमदाबादला का हलवले याबाबत अदानी समुहाने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया अदानी कंपनीकडून देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP