पर्रिकर रुग्णालयात, काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा

टीम महाराष्ट्र देशा – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या आमदारांनी सोमवारी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल भवन गाठले . राज्यपालांनी आम्हाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण द्यावे, असे काँग्रेसचे म्हणणे असून राज्यपाल उद्या (मंगळवारी) काँग्रेसच्या आमदारांना भेटीसाठी वेळ देतील, अशी शक्यता आहे.

गोव्यातील काँग्रस आमदारांचे गटनेते सी कावेलकर यांच्या म्हणण्यानुसार, गोव्यात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे यापूर्वीच आम्हाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करणे गरजेचे होते. तर, सध्या गोव्यात सरकार असूनही नसल्याप्रमाणेच आहे. त्यामुळे काँग्रेसच्यावतीने आम्ही सरकार स्थापनेचा दावा करत असल्याचे कावेलकर यांनी म्हटले आहे.