विजय औटी यांना विरोधकांचा दणका; पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी वर्षा नगरेंची निवड

अहमदनगर/ प्रशांत झावरे – अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या व शिवसेना आमदार विजय औटी यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या पारनेर नगरपंचायतमध्ये अखेर सर्वच विरोधकांनी एकत्र येऊन नाराज शिवसेना नगरसेवकांची मोट बांधत आमदार विजय औटी यांना दणका देत बाजी मारली आहे. आज दुपारी २ वाजता नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणुक पार पडली असुन नगराध्यक्षपदी आमदार विरोधी गटाच्या नगरसेविका वर्षा शंकर नगरे यांनी आमदार गटाच्या शिवसेना नगरसेविका वैशाली आनंदा औटी यांचे पानिपत करत आमदार विजयराव औटी यांच्या पारनेर मधील वर्चस्वाला सुरुंग लावला. तर उपाध्यक्षपदी शिवसेना बंडखोर नगरसेवक चंद्रकांत चेडे यांची निवड झाली असून त्यांनी शिवसेना नगरसेवक दत्तात्रय कुलट यांचा पराभव केला.

Rohan Deshmukh

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष नगरसेविका वर्षा शंकर नगरे यांनी बाजी मारत आमदार विजय औटी यांच्या गटाचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे उधळून लावले. त्यांनी आमदार विजय औटी यांना त्यांच्याच होम पिचवर क्लीन बोल्ड केले असून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार विजय औटी यांच्यासाठी हा पराभव डोकेदुखी ठरणार आहे. अडीच वर्षांपूर्वी याच वर्षा शंकर नगरे यांनी आमदार विजय औटी व त्यांचे कुटुंब राहत असलेल्या वार्डात शिवसेनेच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत दणकेबाज विजय मिळविला होता. आता नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकत त्यांनी औटी यांच्या पारनेर मधील वर्चस्वाला सुरुंग लावला आहे.

तर उपनगराध्यक्ष पदावर शिवसेनेचेच बंडखोर नगरसेवक चंद्रकांत चेडे यांची निवड झाली आहे. गेल्या ४ दिवसांपासून पारनेर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत आमदार विजय औटी यांच्या सर्व विरोधकांनी जोरदार मोर्चे बांधणी करत सत्ता हस्तगत करण्याचा चंग बांधला होता. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वपक्षीय आमदार विजयर औटी विरोधी नेत्यांनी अभिनंदन केले आहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...