मागास भागात रोजगार निर्मितीवर भर देणार – परिणय फुके

गोंदिया : गोंदिया व भंडारा जिल्हे मागास म्हणून ओळखले जातात. दोन्ही जिल्हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहेत. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि कोका वन्यजीव अभयारण्य आहे. येथील पर्यटनातून आणि देवरी येथील औद्योगिक क्षेत्रातून तसेच भंडारा जिल्ह्यातील मकरधोकडा येथे होणाऱ्या इथेनॉल प्रकल्पाच्या माध्यमातून मागास भागाच्या विकासासाठी रोजगार निर्मितीवर आपला भर राहणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.

२२ ऑगस्ट रोजी आमगांव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. फुके यांनी केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार संजय पुराम होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार केशवराव मानकर, भेरासिंग नागपुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, जि. प. महिला व बाल कल्याण समिती सभापती लता दोनोडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, भाजपा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, भाजपा तालुका अध्यक्ष ॲड. उपराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

फुके म्हणाले, विकासाची कामे वेगाने या मतदारसंघात सुरु आहेत. उद्योगांची उभारणी करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे, त्यासाठी धानाच्या तणसापासून इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे. वाया जाणाऱ्या तणसाला सुध्दा किंमत मिळणार आहे. उद्योग निर्मिती आणि पर्यटन क्षेत्रातून रोजगार निर्मितीच्या माध्यमातून मागास भागाचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून जिल्ह्याचे चित्र बदलत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार पुराम म्हणाले, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे पैसे काही शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झाले नाहीत. त्यामध्ये काही अडचणी आहेत, त्या लवकरच दूर करून या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. पाच वर्षात मतदारसंघात विकासाची अनेक कामे करण्यात आली आहेत. आमगांवच्या विकासासाठी साडेपंधरा कोटी रुपये निधी मंजूर आहे. अनेकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या नवीन इमारतीमुळे लोकांची कामे वेगाने होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी फीत कापून इमारतीचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार भोयर यांनी केले. तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक तसेच विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या