पालकांची प्रतिक्षा संपणार, ११ जूनपासून आरटीईची प्रवेश प्रक्रिया होणार सुरु!

औरंगाबाद : कोरोनामुळे मागील चार महिने ब्रेक लागलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया येत्या शुक्रवारपासून (दि.११) सुरू होणार आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना लवकरच शाळेत प्रवेश घेऊन ऑनलाइन शिक्षण सुरु करता येईल. मागील वर्षाप्रमाणे यंदाही शाळा स्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात यावेळी ६०३ शाळांमध्ये ३६२५ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

त्यामध्ये पहिलीसाठी तीन हजार ६२१ तर प्री-प्रायमरीसाठी दोन शाळांमध्ये केवळ चार जागांची क्षमता आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ३० मार्च पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे ११ हजार ८६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी कोणत्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची संधी मिळणार यासाठी शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन लकी ड्रॉ ची प्रक्रिया सात एप्रिल रोजी पार पडली होती. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांमधील ऑनलाइन लॉटरी पद्धतीने २ हजार ६४१ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती.

जून पासून सीबीएससी बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी एसएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. मात्र बहुतेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवलेले अनेक विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले होते. शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याने या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू होईल.

अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे. मागील दोन वर्षांची प्रतिपूर्ती न मिळाल्यामुळे इंग्रजी शाळांनी आरटीई प्रवेशावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल का, शिक्षण विभाग याबाबत काय भूमिका घेणार, मुलांच्या प्रवेशाचे काय होणार अशी शंका पालकांकडून उपस्थित केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP